भारतात लाँच होणार स्वस्त आणि मस्त ईलेक्ट्रीक स्कूटर; किंमत ५० हजारांपर्यंत असण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 04:12 PM2021-04-02T16:12:13+5:302021-04-02T16:14:14+5:30
सध्या ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
भारतीय बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढली आहे.विशेषत: टू व्हिलर सेक्शनमध्ये लोकांनी अधिक स्वारस्य दाखवलं आहे. बजाज ऑटो, हिरो आणि टीव्हीएस या दिग्गज कंपन्यांनीदेखील ईलेक्ट्रीक व्हेईकल्स सादर केली आहेत. तर दुसरीकडे नवीन स्टार्टअपनेही अनेक वाहने बाजारात आणली आहेत. आता बर्ड ग्रुपची सहाय्यक कंपनी बर्ड इलेक्ट्रिक मोबिलिटी देखील आपले नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Bird ES1+ बाजारात आणण्याची तयारी करत आहे.
दरम्यान, या स्कूटरच्या लाँच तारखांविषयी कंपनीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार या स्कूटर या वर्षाच्या मध्यात लाँच होऊ शकतात. सुरुवातीला नवीन इलेक्ट्रिक स्कूटर दिल्ली एनसीआरमध्ये लाँच केली जाईल, त्यानंतर हे देशातील इतर मोठ्या शहरांमध्ये लाँच केली जाणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
Bird ES1+ ही इलेक्ट्रीक स्कूटर मागील ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीने सादर केली होती. तेव्हापासून तिच्या लाँचिंगविषयी अनेक तर्क सुरू होते. कम्प्लिट नॉक डाऊन (सीकेडी) मार्गे या स्कूटरला भारतात आणले जाईल आणि तिचं असेंबलिंग मानेसरमधील कंपनीच्या प्लांटमध्ये केले जाईल. असे म्हटले जात आहे की देशात येणारी ही सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर असेल आणि त्याची किंमत जवळपास 50,000 रुपये निश्चित केली जाऊ शकते.
काय आहेत स्पेसिफिकेशन्स ?
या स्कूटरमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. तसंच याचं डिझाईनदेखील उत्तम आहे. यामध्ये शार्प डिझाईन अससेसा LED हेडलँर/टेललँप तसंच स्प्लिट सीट, LCD इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. या स्कूटरमध्ये ३Ah क्षमतेची लिथिअम आयन बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही स्कूटर ५५ किलोमीटरपर्यंत जाते. तसंच याचा टॉप स्पीड ४५ किलोमीटर प्रति तास आहे.