भाऊ, गाडी हवी जबराटच! एसयूव्हीची विक्री ३३% वाढली; कारविक्री ३% घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 01:56 PM2023-06-14T13:56:30+5:302023-06-14T13:58:00+5:30
मे महिन्यात देशभरात वाहन उत्पादनात ८ टक्के वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वाहनांसाठी अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या सेमीकंडक्टर चिपचा सुरळीत झालेला पुरवठा, सतत नवनवीन वाहनांचे लाँचिंग यामुळे वाहन विक्रीला बुस्टर मिळाला आहे. याचवेळी लोक साधी नव्हे तर दमदार वाहन म्हणून एसयूव्हीला अधिक पसंती देत आहेत. याचवेळी रिक्षाची मागणीही तब्बल ९१ टक्क्यांनी वाढली आहे.
मे महिन्यात देशभरात वाहन उत्पादनात ८ टक्के वाढ झाली असून, यात तीन चाकी वाहनांचे प्रमाण तब्बल २० टक्के तर प्रवासी वाहनांचे उत्पादन १६ टक्के इतके झाले आहे. उत्पादन वाढले असले तरीही निर्यात मात्र २१ टक्क्यांनी घसरली आहे.
विक्रीचा उच्चांक?
एसयूव्ही आणि सेमीकंडक्टर चिप्सचा समाधानकारक पुरवठा यामुळे देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री मे महिन्यात ३ लाख ३४ हजार ८०२ युनिट्सवर पोहोचली आहे. अशीच वाढ मे २०१८ मध्ये पाहायला मिळाली होती. त्यावेळी प्रवासी वाहनांची विक्री ३ लाख १ हजार २३८ इतकी झाली होती.
बुकिंगमध्ये किती वाढ?
देशात वाहन बुकिंग करण्यामध्ये वार्षिक १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचवेळी वाहन घ्यायचे आहे, मात्र आता केवळ चौकशी केली, अशा ग्राहकांची संख्या १७ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळातही वाहन विक्री जोरदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कोणत्या कंपनीची गाडी हवी?
महिंद्रा अँड महिंद्रा ३०%
ह्युंदाई १०%
टोयोटा ७%
टोयोटा किर्लोस्कर मोटर्स ८८%
अहवाल कुणाचा?
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)’ने ही आकडेवारी जाहीर केली आहे.