Royal Enfield चे धाबे दणाणले, 15 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार ब्रिटिश ब्रँडची 'ही' दमदार बाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 06:09 PM2024-08-13T18:09:32+5:302024-08-13T18:10:48+5:30
जाणून घ्या या दमदार बाईकची किंमत अन् फीचर्स...
British Brand Bike in India : या 15 ऑगस्ट रोजी भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने बाईक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकप्रिय ब्रिटीश मोटारसायकल ब्रँड BSA (Birmingham Small Arms) ने व्यवसायाच्या विस्तारासाठी भारतात एन्ट्री घेतली आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी ते आपली पहिली बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. BSA Gold Star 650 असे या बाईकचे नाव असून, भारतात कंपनीची थेट स्पर्धा Royal Enfield शी असेल.
Royal Enfield Interceptor 650 शी थेट स्पर्धा
BSA Gold Star 650 भारतीय बाजारपेठेत थेट रॉयल एनफिल्डच्या Interceptor 650 किंवा Super Meteor शी स्पर्धा करेल. BSA च्या या बाइकला 652 cc, लिक्विड-कूल्ड, 4-व्हॉल्व्ह, ट्विन स्पार्क प्लग इंजिनसह सिंगल-सिलेंडर मोटर मिळणार आहे. हे इंजिन 45 bhp पॉवर आणि 55 Nm टॉर्क जनरेट करेल. तसेच, 5-स्पीड गियर बॉक्सचे फिचरदेखील देण्यात आले आहे.
किंमत किती असेल?
कंपनी बाईकमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देणार आहे. ब्रेकिंगसाठी या बाइकमध्ये सिंगल 320 मिमी फ्लोटिंग डिस्क, ब्रेम्बो ट्विन-पिस्टन फ्लोटिंग कॅलिपर, पुढच्या बाजूला एबीएस आणि सिंगल 255 मिमी डिस्क आहे. या बाईकचे वजन सुमारे 213 किलो आहे. बीएसए गोल्ड स्टार 650 ची किंमत रॉयल एनफील्डच्या इंटरसेप्टर 650 इतकीच असू शकते. म्हणजेच, या बाईकची किंमत 3 ते 3.5 लाख रुपयांच्या आसपास असण्याचा अंदाज आहे.
BSA चा प्रवास
कंपनीच्या प्रवासाविषयी सांगायचे, तर ती 1861 पासून कार्यरत आहे. त्यावेळी ही कंपनी बंदुक बनवण्याचे काम करत असे. 1903 मध्ये कंपनीने मोटरसायकल उद्योगात प्रवेश केला आणि 1910 मध्ये पहिले मॉडेल सादर केले. एकेकाळी बीएसएच्या बाईक्स जगभर प्रसिद्ध होत्या. हँड गियर आणि लॅम्प लाइटसह येणारी बीएसए बाईक ही महायुद्धात सैनिकांची पहिली पसंती होती. या बाईक हलक्या होत्या आणि रात्रीच्या अंधारातही त्या सहज चालवता येत होत्या. या बाईकचे पिकअप आणि मायलेजही तेव्हा बऱ्यापैकी होते. बाईकच्या मदतीने कोणत्याही ठिकाणी वेळेत पोहोचता येत होते. बाईकवरून आलेल्या सैनिकांच्या तुकड्या शत्रूच्या प्रदेशात अचानक हल्ला करून तिथून झटपट निघून जात होत्या.
युद्ध संपले पण बीएसए बाईकने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. बहुतांश बीएसए बाईक्स ब्रिटीश अधिकाऱ्यांनी भारतात आणल्या आणि नंतर या बाईक्स इथेच राहिल्या. दरम्यान, लोकांनी नंतर बाईक इंपोर्ट केल्या, परंतु त्यांची संख्या खूपच कमी होती. आता पुन्हा एकदा बीएसए भारतात प्रवेश करण्याच्या विचारात आहे आणि कंपनी आपली एंट्री लेव्हल बाईक देशात लॉन्च करण्याच्या करणार आहे.