मागून व पुढून बसणाऱ्या संभाव्य धडकेपासून कारचे रक्षण करणारे बंपर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 12:39 PM2017-10-06T12:39:10+5:302017-10-06T12:46:36+5:30
कारला असणारा बंपर आज प्रामुख्याने प्लॅस्टिकच्या व अन्य संलग्न घटकाद्वारे तयार केला जातो. कारला बसणारा छोटा धक्का सहन करण्याची ताकद व सौंदर्याचे एक आविष्कार इतकेच त्याचे काम राहिले आहे
मोटारीच्या पुढे व मागे कोणाचा धक्का बसला तर त्यापासून संरक्षण करण्यासाठी एक भाग असतो, त्याला बम्पर असे म्हणतात. आज भारतातील बहुतांशी मोटारींना बम्पर हे प्लॅस्टिक वा फायबरचे दिले जातात. त्यामध्ये एक प्रकारचा लवचिकपणा व कणखरपणाही असतो. एक प्रकारचे सस्पेंशनचे गुण त्याच्या बनावटीने साध्य केले गेलेले आहेत. अर्थात त्याचे वजन कमी असूनही ते कणखर आहेत, यात शंगा नाही. काही प्रमाणात कारला बसणारा धक्का ते पेलवतात, कारच्या अंतर्गत बॉडीला धक्का न पोहोचू देण्याचे मर्यादित सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे.
पूर्वी लोखंडाचे असणारे बंपर, त्यांच्या वजनामुळे कारच्या बॉडीला प्रत्यक्ष मोठ्या धक्क्याच्यावेळी जास्त हादरा देणारे होते, असे शास्त्रीयदृष्टीने स्पष्ट झाल्यानंतर बंपर प्लॅस्टिकचे वा फायबरचे करण्याचा प्रयत्न सुरू झाला. आज तो प्रत्यक्षात आला आहे. कारला बसणारा मोठा धक्का वा धडक मात्र या बंपरला पेलवणारी नाही. मात्र छोटे धक्के व धडक यामुळे कारच्या पुढील व मागील टोकाकडे लावलेल्या या बंपरमुळे बऱ्याच अंशी कमी होते, कारचे मोठे नुकसान होत नाही, धडक बंपरला बसली की त्या धडकेमुळे बंपर काहीसा आत चेपला जातो, जास्त धडक मोठी असेल तर त्या धडकेमुळे बंपर हा कारच्या बॉडीमध्ये ज्या पद्धतीने खाचा करून बसवलेवला असतो, त्यामुळे तो त्याचा धक्का त्या सर्व बाजूंमध्ये विभागून टाकतो.
बंपरचा शोध १९०१ मध्ये फ्रेडरिक सिम्स यांनी लावला त्यावेळी पादचाऱ्याला धक्का बसू नये आणि एकंदर धक्के कारला मोठ्या प्रमाणात बसू नयेत, ही भूमिका त्यामागे होती. कारचे नुकसान टळावे, किमान दुरुस्ती खर्च असावा व पादचारी मोठ्या प्रमाणात जखमी होऊ नयेत, असा उद्देश या बंपरच्या बसवण्यामागे आहे. १९६८ मध्ये जनरल मोटर्स या मोटार उत्पादक कंपनीने कारच्या बॉडीच्या रंगाचा प्लॅस्टिक बंपर पुढील बाजूला लावला. हा पहिला प्लॅस्टिक बंपर वापरला गेला. त्यानंतर १९७१ मध्ये रेनॉने मोल्डेड प्लॅस्टिक बंपर वापरात आणला. आज आधुनिक कारमध्ये या प्रकारचे व आणखी काही अन्य घटकांचा समावेश असणारे बंपर वापरले जात आहेत. या त पॉलिकार्बोनेट व एबीएस (Acrylonitrile butadiene styrene ) यांचे संमिश्रण असलेले बंपर वापरले जातात.
बंपर हे काही प्रवाशांच्या संरक्षणासाठी नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे कारचे वर सांगितल्याप्रमाणे होणारे संरक्षण व आज कारचे सौंदर्य वाढवण्यासाठी एक वेगळा लूक येण्यासाठी त्याचा वापर केला जातो. लोखंडी वा झातूचे बंपर्सही काही मोटारींना व मोठ्या बस, ट्रकना वापरले जातात.अर्थात छोटी व मोठी वाहनांची होणारी टक्कर लक्षात घेता साहजिकच मोठ्या वाहनाच्या बंपरमुळे लहान वाहनाला बसणारा धक्का जोरदार असतो, त्यामुळे कारचे नुकसान व्हायचे ते होते. मात्र धक्का काही प्रमाणात कमी करण्याची ताकद या प्लॅस्टिक बंपरमध्ये आहे इतकेच. अन्यथा सध्याच्या मोटारींना वापरला जाणारा हा बंपर फार छोट्या डॅशपासून कारचे रक्षण करणारा असेच दिसते. यात सौंदर्यदृष्टी मात्र चांगलीच विकसित केली गेलेली आहे, हे नाकारता येणार नाही.