२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 06:22 AM2024-10-02T06:22:56+5:302024-10-02T06:23:09+5:30
वीज उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०३५ पर्यंत भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण विजेपैकी ६ ते ८.७ टक्के वीज इलेक्ट्रिक वाहने वापरतील, असे गुंतवणूक व्यवस्थापन संस्था ‘आयकीगाई ॲसेट मॅनेजर होल्डिंग्ज’ने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
अहवालात म्हटले आहे की, ईव्हींचा वापर संपूर्ण जगात वाढत आहे. २०२३ मध्ये एकूण जागतिक कार विक्रीत ईव्हींची हिस्सेदारी १८ टक्के झाली. त्यात चीनची हिस्सेदारी अर्ध्यापेक्षा अधिक आहे. ईव्हींच्या विक्रीचे प्रतिबिंब वीज वापरावर उमटणे अपरिहार्य आहे. ईव्हींच्या वाढीबरोबर त्यांची वीज वापरातील हिस्सेदारी वाढत जाईल. भारतात २०३५ पर्यंत ईव्ही वाहने ६ ते ८.७ टक्के वीज वापरतील. अहवालात म्हटले आहे की, उष्णता वाढत असल्यामुळे भारतात एसीसह शीतकरण उपकरणांची मागणीही वाढत आहे.
जागतिक मागणी ९.८ टक्क्यांपर्यंत वाढणार
nअहवालात म्हटले आहे की, जागतिक पातळीवरील वीज वापरात ईव्हींची हिस्सेदारी २०२३ मध्ये ०.५ टक्के होती. २०३५ पर्यंत ती ८.१ टक्के ते ९.८ टक्के होईल.
nवाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतासारख्या देशांना पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा कराव्या लागतील. वीज उत्पादन क्षमतांचा विस्तार करावा लागणार आहे.