इलेक्ट्रिक कार विक्रीमध्ये Tesla नव्हे तर BYD चा आहे दबदबा! 2023 मध्ये सर्वात जास्त गाड्या विकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 01:52 PM2024-02-27T13:52:11+5:302024-02-27T13:52:36+5:30
BYD Sales In 2023 : BYD ने 2023 मध्ये आपल्या वाहनांची विक्रमी विक्री केली आहे.
BYD Sales In 2023: (Marathi News) नवी दिल्ली : जगात सर्वाधिक इलेक्ट्रिक कार कोणती कंपनी विकते? हा प्रश्न ऐकल्यावर काही लोकांच्या मनात टेस्ला कंपनीचे नाव येऊ शकते. टेस्ला ही एक अमेरिकन कंपनी आहे, जी इलेक्ट्रिक कार बनवते आणि जगभरात लोकप्रिय आहे. मात्र, जगात सर्वाधिक इलेक्ट्रिक कार विकणारी कंपनी टेस्ला नसून बीवायडी (BYD) आहे, जी भारतात आधीच आपल्या वाहनांची विक्री करत आहे.
टेस्लाचा अनेक दिवसांपासून भारतात आपल्या प्लॅन्ट उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे लवकरच टेस्ला भारतात आपली इलेक्ट्रिक कार लाँच करू शकते. दरम्यान, BYD ने 2023 मध्ये आपल्या वाहनांची विक्रमी विक्री केली आहे. BYD च्या मते, गेल्या वर्षी कंपनीने 30 लाख वाहनांच्या विक्रीचे लक्ष्य फक्त पार केले नाही तर सलग दुसऱ्या वर्षी न्यू एनर्जी व्हेईकल (NEV) ची जगातील सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी ठरली आहे.
BYD ची भारतात काय आहे परिस्थिती?
एकीकडे, टेस्ला अजूनही भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, BYD आधीच भारतीय बाजारपेठेत व्यवसाय करत आहे. पण, भारतात BYD च्या वाहनांची विक्री नगण्य आहे, ही वेगळी बाब आहे. कारण, या कंपनीच्या गाड्या रस्त्यावर क्वचितच दिसतात. BYD च्या सध्याच्या भारतीय पोर्टफोलिओमध्ये e6 एमपीव्ही आणि Atto-3 इलेक्ट्रिक एसयूव्हीचा समावेश आहे. आता कंपनी आपला पोर्टफोलिओ वाढवत आहे. BYD येत्या 5 मार्चला नवीन इलेक्ट्रिक सेडान लाँच करणार आहे. या कारचे नाव सील (Seal)आहे.