केवळ कार चालवणे म्हणजे मायलेज मिळवणे नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 08:00 AM2017-09-12T08:00:00+5:302017-09-12T08:00:00+5:30
लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी कारही नेहमी चांगल्या स्थितीत असणे जसे आवश्यक आहे तसेच या साऱ्या प्रवासामध्ये स्थिर व संतुलित वेग, योग्य गीयर ऑपरेशन आदी बाबींमुळे चांगले मायलेज मिळते तसेच सुरक्षित प्रवासही सिद्ध होतो
कारचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे केला गेला तर कारची स्थिती ही चांगली राहाते,त्यामुळे कारचे आयुष्य, सुट्या भागांचे आयुष्य, चांगले मायलेज, चांगली सेवा त्या कारमुळे मिळू शकते. मात्र आपलीच कार आहे, कशीही दामटवू असा विचार केल्यास काही दिवसांमध्येच पांढरा हत्ती पोसल्याचा अनुभव नक्कीच येऊ शकतो. यासाठी कारचा नुसता शोभिवंत वस्तू म्हणूनही वापर न करता ती चालवणेही एक अतिशय महत्त्वाची कला समजून घेतली तर कार किफायतशीर म्हणून तुम्हाला अनुभवास येऊ शकेल. कोणतीही कंपनी झीरो मेन्टेनन्स म्हणून सांगत असली तरी ते चूक आहे हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
कारची केवळ बाह्य स्वच्छता कामाची नाही, तिचे अंतर्मनही ओळखा. कारच्या इंजिनाची ताकद, तिला लागणारे तेल, तिच्या टायरमधील हवा, तिच्या हेडलॅम्प व अन्य दिव्यांचे व्यवस्थापन, तिच्या ब्रेकचे व्यवस्थापन या बाबी पाहाण्यासाठी तुम्ही काही मेकॅनिक होण्याची वा तुमचे गॅरेज असायला हवे, याची आवश्यकता नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी कार नेहमी सज्ज हवी. तिच्यात काही काही उणे दुणे असेल तर ते खटकल्यास ते लक्षात ठेवा व अगदीच आयत्यावेळी धावपळ करायला लागू नये याची दखल घेऊन आल्यावर त्या उण्यादुण्याला बाजूला करा. शक्यतो अधिक त्रासदायक असेल तर लांब पल्ल्याच्या प्रवासला जाऊ नका. दुखणे पहिले दुरुस्त करून घ्या. कार लांब नेण्याचे उद्दिष्ट स्पष्ट असायला हवे.
तुम्हाला कारचे ड्रायव्हिंग सुलभ व सुविधाजनक वाटायला हवे, कारच्या इंधनाची बचतही नीटपणे करायला हवी. तसेच ड्रायव्हिंग फटिग येणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी. उत्साही मानसिकतेत ड्रायव्हिंग केल्यास नेहमीच चांगले. लांब प्रवासाला नेण्यापूर्वी तिची पूर्ण तपासणी करा, त्यानंतर सुरुवातीला वायपर टॅंकमध्ये पाणी नीट आहे की नाही, ब्रेक, इंजिन तेल, कूलन्ट यांचा स्तर नीट आहे की नाही, ते तपासा. टायरची हवा तपासा. त्यानंतर वाहनाचे दिवे तपासा. ड्रायव्हिंगला बसण्यापूर्वी तुमचे आसन,आरसा या सर्व बाबी नीट जुळवून घेऊन मग प्रत्यक्ष ड्यायव्हिंग सुरू करा. प्रवासाला निघताना कारचे रनिंग किती झाले आहे, ते टिपून घ्या. कार चालवताना गीयर निहाय वेग ठेवा, अतिवेगापेक्षा स्थिर वेग महत्त्वाचा असतो. त्यासाठी तुमच्या कारचे इंजिनच तुम्हाला अनेकदा सांगत असते. त्यानुसार कारचा गीयर योग्य पद्धतीने टाकणे, त्यासाठी वेग योग्य ठेवणे, वळण, सरळ रस्ता, उतार, खडपडीत रस्ता या पद्धतीच्या पृष्ठभागावरून गाडी नेताना त्या त्या योग्य गीयर व वेगाने ती चालवा. साधारणपणे विनाकारण गीयर बदलू नका.
विविध कारच्या इंजिन क्षमतेनुसार कारचा वेग ताशी ४५ ते ६० कि. मी. या दरम्यान स्थिर ठेवू शकला व टॉपचा वेग ताशी ६० कि.मी. ठेवला तर मायलेज खूप चांगले मिळू शकते. त्यामुळे कार नियंत्रण करण्यासही सोपी असते. तसेच हा वेग कमी नाही, हे लक्षात घ्या. सरळ व सपाट रस्त्यावर कार चालवताना मायलेज स्थिर वेगाला खूप चांगले मिळते. अगदी चांगल्या ताकदीच्या कारलाही ताशी ८० कि. मी. चा वेग भरपूर व मायलेजदायी असू शकतो. मात्र एक्लरेशन देताना हळूवार व एकसंघ असले पाहिजे. स्थिर व संतुलीत वेग, त्यामुळे ड्रायव्हिंगला कंटाळा न येणे, चांगल्या वेगाबरोबरच नियंत्रण असणे या बाबी जमल्या म्हणजे कारच्या आयुष्यावरही चांगला परिणाम होत असतो, तसेच सुरक्षिततेने होणारे ड्रायव्हिंग केव्हाही चांगलेच नाही का?