कारचे ग्रील सौंदर्यवृद्धीसाठी नव्हे तर हवा खेळती राहाण्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 09:44 PM2017-09-20T21:44:01+5:302017-09-20T21:44:12+5:30
कारचे ग्रील म्हणजे फ्रंटफेसिंग अधिक आकर्षक करणारा प्रकार. प्रत्येक कंपनीच्या वेगळेपणाने भारलेले ग्रील त्यामुळेच ग्राहकांच्या कायम लक्षात राहावे असेच करण्याचा प्रयत्न राहिला आहे.
मुंबई, दि. 20 - गेल्या एक-दोन वर्षांमध्ये कारच्या पुढील बाजूला बॉनेट जेथे आपण लावतो त्याखाली दर्शनी भागात असलेल्या ग्रीलला वेगळा लूक देणारे अॅल्युमिनियम वा स्टीलचे ग्रील लावण्याची एक फॅशन निघाली आहे. त्या त्या कारच्या कंपनीच्या आकारानुसार ही ग्रील बाजारात तयार मिळतात. कार उत्पादक कंपनीने दिलेल्या डिझाइनसारखीच ही ग्रील्स असतात मात्र ती धातूची, असतात. त्यामुळे वजनाला काही जड असतात. मुळात अनेक कंपन्या ही ग्रील प्लॅस्टिकमध्ये देतात. काही ग्रील काळ्या रंगाची प्रामुख्याने असतात. तर काही ग्रील ही क्रोप्लेटेड असतात. या क्रोमप्लेटेड ग्रीलची लकाकी काही दिवसांनी अर्थातच कमी होते.मुळातच क्रोम प्लेटिंग हे प्लॅस्टिकवर केलेले असते. लोकांना क्रोम प्लेटिंग वा तसा रंग वा तो लूक आवडतो, हे लक्षात घेऊन काही कंपन्यांनी व वितरकांनीच या अॅल्युमिनियम वा स्टील ग्रीलची रचना करून ग्राहकांसमोर सादर केली आहे. अनेकजण त्या ग्रील आपल्या कारना बसवूनही घेत असतात. दिसायला व सफाईला सुंदर असणारी ग्रील ज्यांना शक्य आहे ते बसवून घेऊ शकतात. केवळ सौंदर्याच्यादृष्टीने ही ग्रील दर्शनीय आहेत. मूळ प्लॅस्टिक ग्रीलचे काम आहे ते खरे म्हणजे पुरेसे असते. अर्थात कारला फ्रंट लूक देण्याच्या विचारातून हे ग्रील्स विकसित झालेले दिसतात. त्याचप्रमाणे त्या ग्रील्सच्या डिझाइनचाही आता एक स्वतंत्र ब्रॅण्ड वा एक ओळख तयार झालेली दिसते. इंजिनाचे, रेडिएटरचे समोरून येणाऱ्या एखाद्या छोड्या दगड, वा वस्तूंपासून संरक्षण होते, तसेच समोरच्या बाजूने हवा रेडिएटरपर्यंत व बॉनेटखाली असलेल्या भागांपर्यंत कारच्या दर्शनी भागात जाऊ शकते.बाहेरच्या बाजूने एक सौंदर्यात्मक रचना असते, त्यामुळे दर्शनीयताही वाढलेली असते, असे हे ग्रील कारच्या स्वतंत्र अस्तित्त्वाचेही भान राखते, कार कंपनीच्या लोगोचा आधार कधी घेते , कधी ग्रीलचे डिझाइनच कारच्या कंपनीचे अस्तित्त्व सांगून जाते. ग्राहकांना आकर्षण करणाहे हे कारचे मुखदर्शन त्यामुळेच कार वितरकांनाही महत्त्वाचे वाटल्यास नवल नाही.युरोपातील मोटार उत्पादनाच्या इतिहासावर नजर टाकली तरी प्रत्येक कंपनीचे वैशिष्ट्य सांगणारी वेगळेपण दर्शवणारी ही ग्रीलची संकल्पना नक्कीच अनन्यसाधारण म्हणायला हवी.