तुमच्याकडे कार, बाईक आहे का? १ एप्रिलपासून आर्थिक झटका सोसण्याची तयारी ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 06:48 PM2022-03-06T18:48:20+5:302022-03-06T18:48:44+5:30
१ एप्रिलपासून खिशावर अतिरिक्त भार पडणार
मुंबई: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय विविध प्रकारात येणाऱ्या वाहनांच्या थर्ड पार्टी विम्याचा प्रीमियम वाढवण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव मंत्रालयानं ठेवला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून कार आणि दुचाकीवरील विम्याचा हफ्ता वाढेल.
मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार, १ हजार सीसीच्या खासगी कारवरील थर्ड पार्टी विम्याची रक्कम वाढून ती २ हजार ९४ रुपये होईल. २०१९-२० मध्ये ही रक्कम २ हजार ७२ रुपये होती. तर १ हजार सीसी ते १५०० सीसीच्या खासगी कारच्या विम्यासाठी ३ हजार ४१६ रुपये मोजावे लागतील. सध्या या कारसाठी ३ हजार २२१ रुपये मोजावे लागत आहेत. १५०० सीसीवरील कारसाठी ७ हजार ८९० रुपयांऐवजी ७ हजार ८९७ रुपये मोजावे लागतील.
दुचाकींसाठी इतकी रक्कम मोजावी लागणार
१५० ते ३५० सीसीच्या दुचाकीचा प्रीमियम १ हजार ३३६ रुपये होईल. तर ३५० सीसीपेक्षा अधिकच्या दुचाकींचा प्रीमियम २ हजार ८०४ रुपये होईल.
कोविड-१९ मुळे दोन वर्षांत थर्ड पार्टी विम्याच्या रकमेत वाढ झालेली नाही. प्रीमियममधील वाढ १ एप्रिस २०२२ पासून लागू होईल.
इलेक्ट्रिक कार मालकांना फायदा
इलेक्ट्रिक खासगी कार, इलेक्ट्रिक दुचाकी, सामान वाहून नेणारी इलेक्ट्रिक व्यवसायिक वाहनं आणि इलेक्ट्रिक प्रवासी वाहनं यांच्यासाठी १५ टक्क्यांची सवलत प्रस्तावित आहे. हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांच्या विम्याच्या प्रीमियमवर ७.५ टक्के सवलत प्रस्तावित आहे. पर्यावरणपूरक वाहनांना चालना देण्यासाठी ही सवलत देण्यात येत आहे.