डिसेंबरसाठी कार उत्पादकांनी जाहीर केली भरघोस सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 02:47 AM2020-12-18T02:47:38+5:302020-12-18T02:47:48+5:30
सवलतीचे दर ३१ डिसेंबरपर्यंत कायम राहतील.
नवी दिल्ली : देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांनी डिसेंबर महिन्यासाठी आपल्या विविध कार मॉडेलांच्या किमतीवर भरघोस सूट जाहीर केली आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, होंडा, रेनॉल्ट आणि टोयोटा यांचा त्यात समावेश आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरमध्ये सर्वोत्तम विक्रीची नोंद करणाऱ्या कार उत्पादन उद्योगाने आता डिसेंबरमध्येही चांगली विक्री व्हावी यासाठी किमतीत सवलती जाहीर केल्या आहेत. सवलतीचे दर ३१ डिसेंबरपर्यंत कायम राहतील.
देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुतीने ३० हजार ते ५० हजार रुपये या दरम्यान सूट जाहीर केली आहे. वॅगन आर आणि स्विफ्टवर अनुक्रमे ३० हजार आणि ४५ हजारांची सूट आहे. ब्रेझावर ४० हजार, तर डिझायरवर ३५ हजारांची सवलत आहे. एस-प्रेसोवर ५० हजारांची सूट जाहीर करण्यात आली आहे. ह्युंदाईच्या गाड्यांवर ५० हजार ते १ लाख रुपयांची सूट ग्राहकांना मिळणार आहे. सँट्रोवर ५० हजार, ग्रँड आय१० निओस आणि ऑरा यांच्यावर अनुक्रमे ६० हजार आणि ७० हजारांची सूट मिळेल.
तीन लाखांपर्यंत मिळणार लाभ
टाटा मोटर्सने हॅरियर्सवर ८५ हजार, टिॲगोवर २५ हजार, तर नेक्सॉनवर १५ हजारांची सूट जाहीर केली आहे. महिंद्रा ॲण्ड महिंद्राने स्कॉर्पिओवर ३० हजार, तर आल्टरस जी४वर ३,०६,००० रुपये अशी भरघोस सूट दिली आहे. होंडा कार्स इंडियाने ॲमेझवर ३७ हजार आणि सिटीवर ३० हजार रुपये सवलत जाहीर केली आहे. कंपनीच्या सिव्हिकवर सर्वाधिक २,५०,००० रुपयांची सूट देण्यात येत आहे.