कार म्हणजे गॅरेज वा गोदाम नव्हे... तेव्हा मोटार ठेवा सुटसुटीत व स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:18 AM2017-08-14T11:18:22+5:302017-08-14T11:19:19+5:30
कारची डिक्की ही तुमच्या प्रवासातील वैयक्तिक सामानासाठी अधिक असते, तेव्हा डिक्की म्हणजे कार दुरुस्ती व देखभालीचे अत्याधुनिक गॅरेज वा गोदाम करू नका.
काही लोकांच्या कार म्हणजे अप्रतिम गोदाम बनलेले असते. डिक्कीमध्ये विनाकारण अनावश्यक सामान ठेवलेले आहे, स्वयं पूर्ण गॅरेजसारखी विविध हत्यारे, साधने त्यात ठेवलेली आहेत, पाण्याची बादली, व्हॅक्यूम क्लीनर, पाण्याचा बॅटरीवर चालणारा स्प्रे, हायड्रोलिक जॅक अशा बऱ्याच गोष्टींनी आपली कार सुसज्ज केल्याचे समाधान काही लोकांना मिळते. वास्तविक इतक्या बाबींची खरोखरच आवश्यकता नसते. वैयक्तिक वापराची कार असली तरी तुम्ही काही सर्वच साधनांचा वापर करून कार वा मोटारीची देखभाल करता असेही नाही. तसे असेल तर कारसाठी स्वतंत्र पार्किंग लॉट वा गॅरेज असेल तेथे ही साधने ठेवावीत. सतत गाडीबरोबर त्या वस्तुंचा राबता असण्याची गरज नाही. त्यामुळे कुठे लांब दौरे असले तर सामान ठेवायलाच जागा नसेल. लांब दौऱ्यावर जातानाही इतक्या साधनसामग्रीची काही गरज नसते. काही समस्या आलीच तर गॅरेजचाच शोध घेतला जातो.
यामुळे प्रश्न असा पडतो की गाडीमध्ये गाडीसाठी जरुरीचे असे किती सामान असावे, तुम्ही प्रवासात काही वाटेत गॅरेज खोलून काम करीत बसणार नाही. साधारणपणे स्टेपनी सज्ज ठेवा, पंक्चर टायर बदलण्यासाठी जॅक व संलग्न साहित्य ठेवा., हेडलॅम्पचे योग्य दोन बल्ब अतिरिक्त असले तर ते घ्या, प्रथमोपचार कीट कायम सज्ज असूद्या. त्यातील औषधे एक्सपायरी डेट उलटून गेली असतील तर ती बदला, टॉर्च, पाण्याच्या दोन मोठ्या बाटल्या पुरे झाल्या, स्क्रू ड्रायव्हर, पाने, पकड, प्लॅस्टिकच्या बाटलीचा पाण्याचा स्प्रे, सिग्नल ट्रॅगल, दोन तीन फडकी इतक्या बाबी पुरेशा असतात. पण त्यामुळे गरजेच्यावेळी तुमचे काम करून देणाऱ्या या साधनांमळे डिक्की भरूनही जाणार नाही आणि तुमचे व तुमच्या बरोबरच्यांचे वैयक्तिक सामान ठेवायलाही जागा राहील. विनाकारण अनावश्यक अशी कार दुरुस्तीची, सफाईची साधने हौस म्हणून कारमध्ये ठेवू नका. यामुळे कार अडगळीची वाटणार नाही. साफ करायला तुम्हालाही सोपी जाईल. अनेकदा नवनव्या साधनांची माहिती मिळाल्यानंतर नवनवीन कार घेणारे विविध अतिरिक्त साधनांच्या मोहातच पडतात. तसे केल्याने खरे म्हणजे सारा दिखावूपणाच निर्माण होतो. नव्याची नवलाई नऊदिवस राहाते व ती साधने नंतर नुसती पडून राहातात. यासाठी खर्च केलेले पैसेही वायाच गेलेले असतात. गाडी हे प्रवासाचे साधन आहे, त्यासाठीच ते वापरा.