रात्री हायवेवर कार पार्किंग करताना अतिदक्षता घेणे महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 02:04 PM2017-10-26T14:04:45+5:302017-10-26T14:10:25+5:30
महामार्ग, द्रुतगती महामार्ग यावर कार पार्क करताना अतिदक्षता महत्त्वाची आहे. विशेष करून रात्री पार्क करताना विनाकारण कार उभ करू नये, केल्यास प्रथम पार्किंग लाइट चालू करावेत
महामार्गावर कार चालवताना वा वाहन चालवताना जशी काळजी घ्यावी लागते, तशीच महामार्गावर ते वाहन पार्क करताना वा बाजूला उभे करतानाही काळजी घ्यावी लागते. विशेष करून रात्रीच्यावेळी ही काळजी अधिक स्वरूपात घेणे महत्त्वाचे असते. महामार्ग दुभाजक असणारा असो की द्रुतगती, त्यावर कार पार्क करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कार ही अवजड वाहनांच्या तुलनेत लहान व हलकी असते, त्यामुळे ती पार्क करताना रस्त्याच्या बाजूला योग्य जागा बघून पार्क कराच. एकेरी रस्ता असताना रस्त्यावरून दोन वाहने समोरासमोर जात असताना साइड देत असतात, त्यावेळी ती रस्त्याच्या डाव्या बाजूला काहीशी येतात.
मुंबई-पुणे यासारख्या द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूला मिळून जवळजवळ सहा पदरी मार्ग आहेत. प्रत्येक मार्ग स्वतंत्र आहे व रस्त्याला दुभाजक असल्याने समोरून येणारे वाहन हे तुमच्या रांगेत येणार नाही. मात्र डाव्या बाजूला वाहन पार्क करण्यासाठी जेथे जागा आहे. तेथे ते वाहन उभे करताना अतिशय सावधपणे व जास्तीतजास्त डाव्या बाजूला उभे करावे. ते ही विनाकारण वा टाइमपास करण्यासाठी नव्हे. गरज असेल तरच ते उभे करावे. वाहन रात्रीच्यावेळी उभे करताना रस्त्याच्या पूर्ण डाव्या बाजूला उभे करावे व पार्किंग लाइट त्वरेने चालू करावेत.
वाहन बिघडले असेल तर त्यासाठी पार्किंग लाइट चालू करून कारच्या मागे सुमारे १० मीटर अंतरावर सुरक्षा ट्रँगल लावावा. कारमधील वा वाहनामधील प्रवाशांनी रस्त्यावर विनाकारण येऊ नये. द्रुतगती महामार्ग असो की साधा महामार्ग असो येणारी वाहने वेगाने येत असतात, ती चालवणाऱ्याला रात्रीच्यावेळी एखादी व्यक्ती मध्ये आले तर गोंधळायला होऊ शकते. त्यामुळे कार पार्किंग करणे हे अतिशय गरजेचे असेल तरच करावे. दुभाजक नसणाऱ्या महामार्गावर रस्त्याच्या डाव्या बाजूला शक्य तितकी आतमध्ये कार लावावी. तसेच जर रस्त्याच्या बाहेर काही जागा असेल तरी तेथे कार लावावी, कार पार्किंग लाइट चालू ठेवावेत. तसेच जरी रस्त्यापासून आतमध्ये बऱ्यापैकी अंतरात जरी कार लावली असेल तरी आतील प्रवाशांनी विनाकारण रस्त्यावर बाहेर येऊ नये. कार बिघडली असेल तर रस्त्याच्या काहीशा कडेला ती लावली गेली तर अधिक दक्षता घ्यावी.
ठळक मुद्दे
रस्त्याच्या डाव्याबाजूला कार उभी करावी
पार्किंग लाइट चालू करावेत.
हेडलॅम्प अप्परमध्ये चालू ठेवू नयेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या चालकांना त्रास होतो.
कारमधील प्रवाशांनी रस्त्यावर विनाकारण रस्त्यावर वावरू नये.
लहान मुलांनाही कारमधून बाहेर येण्यापासून रोखावे.
सुरक्षा रिफ्लेक्टर ट्रँगलचा कारमागे वापर करावा