1 कोटी रुपयांची TATA Safari! नेपाळ आणि पाकिस्तानमधील कारच्या किमती, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 11:16 AM2022-05-13T11:16:25+5:302022-05-13T11:17:22+5:30
car prices : भारतात विकल्या जाणार्या अनेक गाड्या पाकिस्तानातही विकल्या जातात, पण तिथल्या या गाड्यांच्या किमती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
नवी दिल्ली : भारतातील अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपली गाड्या नेपाळसह इतर शेजारील देशांमध्ये निर्यात करतात. मात्र, शेजारील देशांमध्ये या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो. हा कर आकारल्यानंतर या गाड्यांची किंमत भारताच्या तुलनेत जवळपास 3 पट वाढते. भारतात विकल्या जाणार्या अनेक गाड्या पाकिस्तानातही विकल्या जातात, पण तिथल्या या गाड्यांच्या किमती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
टाटा सफारी (TATA Safari) या एसयूव्हीची भारतातील एक्स-शोरूम किंमत 15.25 लाख ते 23.46 लाख रुपये आहे. तर नेपाळमध्ये या कारची किंमत 63.56 लाख रुपये आहे, जी भारतातील तुलनेत जवळपास 2.7 पट जास्त आहे. नेपाळमध्ये 6 आणि 7-सीटर टाटा सफारीची एक्स-शोरूम किंमत 83.49 लाख रुपये ते 1 कोटी रुपये आहे. भारतीय बाजारात किआ सॉनेटची (Kia Sonnet) एक्स-शोरूम किंमत 7.15 लाख रुपयांपासून सुरू होते. नेपाळमध्ये या कारची किंमत 36.90 लाख रुपयांपासून सुरू होते, जी भारतीय चलनानुसार अंदाजे 23.10 लाख रुपये आहे. नेपाळमध्ये महागड्या गाड्यांवर सरकार 298 टक्के कर वसूल करते.
पाकिस्तानमधील ऑटोमोबाईल क्षेत्राकडे पाहिले तर येथील बाजारात सुझुकी अनेक कारची विक्री करते. ज्या भारतात देखील उपलब्ध केल्या जातात, यामध्ये ऑल्टो, वॅगनआर आणि स्विफ्ट यांचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये ऑल्टोची किंमत 14.75 लाख रुपयांपासून सुरू होते, जी भारतात 6 लाख रुपये इतकी आहे. याचबरोबर, पाकिस्तानमध्ये वॅगनआरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 20.84 लाख पाकिस्तानी रुपये आहे, जी भारतीय चलनात सुमारे 8.47 लाख रुपये आहे. याशिवाय, पाकिस्तानात विकली जाणारी वॅगनआर ही हॅचबॅक आधीची जनरेशन आहे, तर नवीन जनरेशनची कार भारतात जवळपास 3 वर्षांपासून विकली जात आहे.
सुझुकी स्विफ्टबद्दल सांगायचे झाले तर पाकिस्तानमध्ये या हॅचबॅकच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 27.74 लाख पाकिस्तानी रुपये आहे, जी भारतीय चलनात सुमारे 11.28 लाख रुपये आहे. मारुती सुझुकी ऑल्टोची भारतातील एक्स-शोरूम किंमत फक्त 3.39 लाख रुपये आहे, तर मारुती सुझुकी वॅगनआर आणि स्विफ्टची भारतातील एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 5.47 लाख रुपये आणि 5.92 लाख रुपये आहे. त्यामुळे शेजारी देश भारतात विकल्या जाणाऱ्या या गाड्यांच्या किमतीच्या दुप्पट ग्राहकांकडून शुल्क आकारत असल्याचे स्पष्ट होते.