5 लाखांहून अधिक ग्राहक SUV कारच्या प्रतीक्षेत, बुकिंग करूनही अद्याप डिलिव्हरी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 04:49 PM2022-08-21T16:49:11+5:302022-08-21T16:49:54+5:30
Automobile : भारतात 5 लाखांहून अधिक ग्राहक आपल्या एसयूव्ही कारची वाट पाहत आहेत. परंतु त्यांना अद्याप त्यांच्या एसयूव्हीची डिलिव्हरी मिळालेली नाही.
नवी दिल्ली : भारतीय कार बाजारपेठेतील हा सर्वोत्तम टप्पा सुरू आहे. देशातील कार बाजारात प्रचंड तेजी आहे. दुसरीकडे, छोट्या कारऐवजी एसयूव्ही कार ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहेत. अशा परिस्थितीत कार कंपन्यांकडे भरपूर ऑर्डर आणि बुकिंग असते. पण, एसयूव्ही कारच्या डिलिव्हरीची वेळ त्रासदायक आहे.
भारतात एसयूव्ही कारसाठी 5 लाखांहून अधिक ग्राहक आपल्या कारची वाट पाहत आहेत. परंतु त्यांना अद्याप त्यांच्या एसयूव्हीची डिलिव्हरी मिळालेली नाही. महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio N), महिंद्रा एक्सयूव्ही 700 (Mahindra XUV700), ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही (Hyundai Creta SUV) इत्यादींच्या खरेदीदारांची अवस्था वाईट आहे. सेमीकंडक्टर चिप्सच्या जागतिक कमतरतेमुळे ऑटोमोबाईल उद्योगाच्या उत्पादन क्षमतेवर गंभीर परिणाम झाला आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओ एन
देशात 5 लाखांहून अधिक एसयूव्ही कार खरेदीदार डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ एनच्या खरेदीदारांची संख्या सर्वाधिक आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ एनचे जवळपास 1.5 लाख युनिट्सची अजून डिलिव्हरी बाकी आहे. महिंद्र स्कॉर्पिओ एनच्या 25,000 युनिट्सची पहिली बॅच एका मिनिटात विकली गेली. नवीन स्कॉर्पिओची लोकांमध्ये इतकी प्रचंड क्रेझ होती की, अवघ्या अर्ध्या तासात 1 लाख युनिट्सची विक्री झाली.
महिंद्रा एक्सयूव्ही 700
कॉम्पॅक्ट आणि मध्यम आकाराच्या एसयूव्हींना भारतात मोठी मागणी आहे. त्यामुळे डिलिव्हरीसाठीही बराच वेळ लागेल. महिंद्रा एक्सयूव्ही 700 एसयूव्हीच्या खरेदीदारांना सर्वात जास्त वाट पाहावी लागेल. महिंद्रा एक्सयूव्ही 700 च्या निवडक व्हेरिएंटची प्रतीक्षा कालावधी एक वर्षापेक्षा जास्त आहे. एक्सयूव्ही 700 चे 1 लाख युनिट्स सध्या प्रलंबित आहेत. ही एसयूव्ही 5 आणि 7 सीटर आहे आणि तिची एक्स-शोरूम किंमत 13.18 आणि 24.58 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी आणि ह्युंदाईची एसयूव्ही
देशातील आघाडीच्या कार कंपन्यांच्या मारुती सुझुकी आणि ह्युंदाईच्या एसयूव्ही गाड्यांनाही दीर्घ प्रतीक्षा कालावधी आहे. ह्युंदाई क्रेटा आणि व्हेन्यू एसयूव्हीचे एकूण 1.5 लाख खरेदीदार डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचवेळी, मारुती सुझुकी ब्रेझा आणि ग्रँड विटाराचे एकूण 1.2 लाख संभाव्य खरेदीदार डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत बसले आहेत. रिपोर्ट्सनुसार, ह्युंदाई क्रेटाचे फेसलिफ्ट व्हर्जन पुढील वर्षी भारतात दाखल होऊ शकते.