कारच्या क्लचचा सावध वापर हाच वेगनियंत्रणाचा व क्लचच्या टिकावूपणाचा पाया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 02:50 PM2017-09-08T14:50:30+5:302017-09-08T14:54:08+5:30
कारच्या क्लचचा वापर अतिशय सुयोग्यपणे केला जाणे गरजेचे आहे. तो न करणे म्हणजेच त्या क्लचचे आयुष्य कमी करणे व वेग नियंत्रणातील प्रभाव हळू हळू कमकुवत करण्यासारखे आहे.
गेल्या लेखात क्लचचा मोटारसायकल व स्कूटरमध्ये वापर कसा करावा, त्याचे फायदे काय हे पाहिले. मॅन्युअल ट्रान्समीशन असणाऱ्या कारमध्येही क्लच हा एकंदर कार्यप्रणालीतील महत्त्वाचा घटक आहे. ड्रायव्हरच्या पायाशी असलेले डाव्या बाजूचे पॅन्डल म्हणजे क्लच. हा दाबून तो कार्यान्वित होतो व गीयर टाकण्यासाठी व बदलण्यासाठी त्याचा वापर होतो.क्लचचे मुख्य कार्य म्हणजे तुमच्या कारचे गीयर शिफ्टिंग सुलभपणे केले जाणे. त्यासाठी तुम्ही क्लचचा वापर कसा करता ते महत्त्वाचे आहे. गीयर टाकणे व तो प्रत्यक्षात कार्यरत करणे व ते करताना क्लच दाबून व योग्य पद्धतीने पुन्हा रिलिज करणे गरजेचे असते. गीयर व क्लचचे हे सिन्क्रोनायझेशन अतिशय योग्य पद्धतीने झाले पाहिजे.
कारमध्ये सर्वसाधारणपणे पाच पुढच्या गतीसाठी व एक मागच्या गतीसाठी असणारा म्हणजे रिव्हर्स गीयर असे एकंदर पाच व एक रिव्हर्स गीयर. अर्थात सहा गीयर असतात. क्लच दाबून योग्य गीयर टाकणे, प्रत्येक गीयरनुसार त्याचा निर्दिष्टित वेग ठेवणे आवश्यक असते. पाचव्या गीयरमध्ये साधारणपणे कार ताशी ४० कि.मी. वेगापुढे असते. अशावेळी अकस्मात ब्रेक लावण्याची वेळ येथे तेव्हा तुम्हाला क्लच दाबून तो गीयर पाचव्या गीयरवरून तिसऱ्या गीयरवर आणता येतो, त्यामुळे गीयरद्वारे वेग नियंत्रण करण्याचा पर्याय मिळत असतो. ब्रेक व गीयर कंट्रोल याद्वारे कारच्या वेगावरही नियंत्रण आणणे शक्य होते. पण त्यासाठी क्लचचा वापर तुम्हाला अतिशय सुयोग्यपणे व प्रभावी करता आला पाहिजे.
क्लचचा वापर करताना क्लचप्लेटवर ताण येईल, असा कोणताही वापर करू नये. हाफ क्लचचा वापर वारंवार करणे, क्लचवर पाय ठेवणे व त्यामुळे कदाचित क्लच अर्धा दाबला जाणे, गीयर बदलायचा नसला तरी उगाचच क्लच दाबणे, क्लच दाबून एक्लरेशन देणे,उगाचच दाबून उतारावरून जाताना कार न्यूट्रलसारखी जाते व तेव्या अचानक तो सक्च सोटून कंट्रोल करण्याचे चाळे करणे, आदी अनावश्यक क्रिया केल्यास क्लचच्या वापरावर विनाकारण ताण येतो. त्यामुळे क्लचचे आयुष्यही कमी होते. वाहतूककोंडीच्यावेळी विशेष करून शहरामध्येक्लचचा वापर अधिक करावा लागतो. मात्र सिग्नलला कार थांबवलेली असताना ती न्यूट्रलला घेण्याचे राहून जाते, अशावेळी काहीजण हाफ क्लच वापर करतात व दुसऱ्या गीयरवर जर गाडी राहिलेली असेल तरी ती उठवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकाराने क्लचवर नक्कीच ताण येत असतो. चढावावर, पुलावर चढणीमध्ये वाहतूक थांबली गेल्यानंतर क्लचचा वापर करून ती मागे सरण्यापासून काही ड्रायव्हर्स विनाकारण हाफ क्लच वापरत असतात. अशावेळीही क्लचच्या या वापरण्याने क्लचप्लेटवर ताण येतो.
क्लच प्लेटचे आयुष्य आपण किती वाढवू ते मात्र अनेकदा आपल्या हातात असते. हे सांगण्याचे कारण एकदा का क्लचप्लेट गेली की पूर्ण बदलण्याशिवाय गत्यंतर नसते. तसेच त्याची किंमत व पुन्हा ती प्रणाली सेट होईपर्यंत वेळ जात असतो. क्लचचा सुयोग्य वापर केल्याने मायलेज योग्य मिळते, क्लच हा त्यामुळेच अतिशय महत्त्वाचा असा घटक असून तो नीट वापरल्याने तुमची वेळ, सुरक्षितता आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे आयुष्य वाढवणे हे तुमच्या हाती असते.