भारतात जानेवारी 2022 पासून गाड्या महागणार? कंपन्या किमती वाढवण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 07:35 PM2021-11-29T19:35:38+5:302021-11-29T19:36:24+5:30
Cars : भारतातील बहुतांश कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. ET Auto च्या मते, जानेवारी 2022 पासून कारच्या किमती वाढू शकतात.
नवी दिल्ली : चालू वर्ष वाहन उत्पादकांसाठी अत्यंत वाईट ठरले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीचे सावट होते. दरम्यान, भारतात सणासुदीचा हंगाम वाहन उत्पादकांसाठी नेहमीच चांगला असतो. मात्र, यावेळी सेमीकंडक्टर चिप्सच्या कमतरतेमुळे, मागणी करूनही कंपन्या त्या पूर्ण करण्यास विलंब करत आहेत. यानंतर आता पुढील वर्ष ग्राहकांसाठी निराशाजनक ठरू शकते.
भारतातील बहुतांश कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. ET Auto च्या मते, जानेवारी 2022 पासून कारच्या किमती वाढू शकतात. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून, कार उत्पादकांमध्ये हा ट्रेंड कायम आहे, ज्यामध्ये नवीन वर्ष येताच जवळजवळ सर्व कंपन्या कारच्या किमती वाढवतात. या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी ( Maruti Suzuki), ह्युंडाई (Hyundai)आणि एमजी (MG) या कंपन्यांचा समावेश आहे. जागतिक चिपच्या तुटवड्याव्यतिरिक्त, किंमतीतील वाढ हे देखील कारच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण आहे.
जानेवारी 2022 मध्ये वाढ अपेक्षित
मारुती सुझुकी सारख्या दिग्गज वाहन उत्पादक कंपनीने 2021 मध्येच आपल्या वाहनांच्या किमती तीनदा वाढवल्या आहेत आणि जानेवारी 2022 मध्ये संभाव्य वाढ त्याच्या किमती आणखी वाढवणार आहे. किमती वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे लवकरच लागू होणारा CAFE2 नियम, ज्यामध्ये कार निर्मात्यांना त्यांचे सरासरी Co2 उत्सर्जन 113 g/kg ने कमी करावे लागेल. त्यामुळे आता या तीन कारणांचा हवाला देऊन बहुतेक कंपन्या जानेवारी 2022 पासून त्यांच्या कारच्या किमती वाढवू शकतात.