टोयोटाची नवी कार ठरणार आपल्या कुटुंबाची 'गार्डियन'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 04:51 PM2019-01-08T16:51:13+5:302019-01-08T16:54:12+5:30
ड्रायव्हर चुकत असल्यास गाडी ऑटोमॅटिक सेल्फ कंट्रोल होणार
चालक चुकल्यास, दारू पिऊन कार चालवत असल्यास त्याच्याकडून कारचा ताबा काढून घेऊन सुरक्षा पुरविणारी टोयोटाची गार्डीयन ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. 2020 मध्ये या प्रणालीची सेल्फ ड्राइविंग कार उपलब्ध करण्यात येणार आहे, असे टोयोटा रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिल प्रॅट यांनी सोमवारी सांगितले.
टोयोटाच्या फुल्ल सेल्फ ड्राइविंग सिस्टमपेक्षा ही नवीन प्रणाली वेगळी असून गरज पडल्यास कार स्वतःच ताबा घेईल आणि पुढे जात राहील, असे प्रॅट यांनी वार्षिक सीईएस ग्लोबल टेचनोलॉजि कॉन्फरन्समध्ये सांगितले. ही नवीन प्रणाली इतर ऑटो कंपन्यांना देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
टोयोटाने त्यांच्या सेल्फ ड्राइविंग प्रणालीच्या कारसाठी ड्युल ट्रॅक strategy वापरली आहे. गार्डीयन ही प्रणाली अत्यंत आधुनिक अशी ड्रायव्हरसाठी मदत करणारी प्रणाली असल्याचे इन्स्टिट्यूटचे वरीष्ठ उपाध्यक्ष रेयान युस्टीस यांनी सांगितले.
गार्डीयन प्रणाली नेमकी आहे तरी काय?
गार्डीयन म्हणजे पालकत्व किंवा संरक्षण करणे होय. ही प्रणाली तिचा अर्थ सार्थ ठरवते. ही प्रणाली कार समोरच्या एखाद्या वस्तूवर आदळणार असेल तर कारचा त्वरित ताबा घेते आणि वाचवते. तसेच एखादे वाहन समोरून येत असल्यास किंवा त्याचा एकदम जवळ आल्यास चालकाकडून नियंत्रण काढून घेऊन स्वतः त्या वाहनाच्या रेषेतून बाजूला होते. 2020 मध्ये ही प्रणाली कारसाठी उपलब्ध होणार असून यामुळे अपघाती मृत्यू कमी होतील असा विश्वास इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
जगभरात दरवर्षी 1.3 दशलक्ष मृत्यू रस्ते अपघातात होतात. सेल्फ ड्राइविंग कार्सचा बाजार हा 10 ट्रीलिअन डॉलर एवढा प्रचंड आहे. या कारमुळे अपघात रोखता येतील. यामुळे अनेक जीव वाचतील, असे मत फोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम हॅकेट यांनी सांगितले.
गार्डीयन ही प्रणाली विकसित करण्यासाठी टोयोटाला तीन वर्षे लागली. चालक जेव्हा घाबरलेला असेल, दारू पिलेला असेल किंवा धोकादायक पद्धतीने कार चालवत असेल तेव्हा ही कार त्याला निष्क्रिय करणार आहे. त्याच्याकडील स्टीअरिंग, ब्रेक, क्लच, गिअर याचा ताबा काढून घेऊन ती काम करणार आहे. या कारमध्ये कॅमेरा, सेन्सर हे सेल्फ ड्राइविंग कारसारखेच आहेत, मात्र कार्यप्रणाली ही वेगळी असणार आहे. ही प्रणाली चालकाच्या चुका तात्काळ दुरुस्त करून सुरक्षित प्रवास करणार आहे.