प्रवासाला जाताना कार सुरू करण्यापूर्वी सारी जुळवाजुळव अवश्य करा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 05:00 PM2017-08-24T17:00:00+5:302017-08-24T17:00:00+5:30
कार ड्राईव्ह करण्याआधी ड्रायव्हिंग सीटवर बसणाऱ्याने विविध बाबींची तपासणी करणए गरजेचे असते. त्यामुळे प्रत्यक्ष कार चालवताना काही चुकल्यासारखे नक्कीच वाटत नाही.
वैयक्तिक वापराची कार बाळगून तिचा नियमित वापर करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. ज्या मोटारीवर आपण एक गुंतवणूक करतो, त्या वस्तूचा वापर हा जर पूर्णपणे झाला नाही, तर उपयोग काय. यासाठीच किमान वर्षाला १२ हजार किलोमीटर तितके तरी त्या कारचे रनिंग होणे आवश्यक आहे. महिन्यातून एक लांबची टूर करणे असे किंवा आठवड्यातून एक-दोनवेळा ती वापरणे असो. कार वापरण्याच्या या सलग वा नियमित नसलेल्या वेळी कार चालवताना अनेक बाबी नीटपणे लक्षात घ्याव्या लागतात. अगदी एकहाती जरी तुम्ही वापरीत असलात तरीही, ड्रायव्हिंग सीटवर बसण्यापूर्वी तुमच्या ड्रायव्हिंगमध्ये कार रस्त्यावर प्रत्यक्ष आल्यानंतर काही अडचणीचे वाटता कामा नये, ही बाब लक्षात ठेवायला हवी. नियमितपणे ड्रायव्हिंग करणाऱ्यांना कार सुरू करण्यापूर्वी वा रस्त्य्वार आणण्याआधी आपल्याला सोयीने कसे ड्राईव्ह करता येईल, याची एक जाणीव झालेली असल्याने त्यांच्या हाताला अनेक चांगल्या सवयीही लागलेल्या असतात. त्यामुळे कार प्रत्यक्ष चालवताना त्यांना अडनिडे झाल्यासारखे वाटत नाही. तसे केल्याने प्रत्यक्ष ड्राईव्ह करताना कोणतीही जुळवणी, अॅडजेस्टमेंट करण्याची गरज लागत नाही. ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर काही चुकल्यासारखे वाटू नये, इतकेच हे सांगण्याचा हा हेतू आहे.
कारमध्ये बसण्यापूर्वी कारचे सर्व टायर्स तपासा, त्यात हवा नीट आहे की नाही, त्याचा अंदाज घ्या. त्यानंतर काचेवर असणारी धूळ स्वच्छ करा. वायपर नीट तपासा, काचेवर पाणी मारणारी वायपर संलग्न यंत्रणा नीट आहे का, त्याच्या पाण्याच्या कॅनमध्ये पुरेसे पाणी आहे का ते तपासा नसले तर पाणी पूर्ण भरा. लांबच्या प्रवासाला जाण्यापूर्वी ब्रेक ऑईल, इंजिन ऑईल यांचा स्तर नीट आहे का नाही, ते पाहा. कूलन्टच्या द्रावणाचा स्तर तपासा, टेललॅम्प,हेडलॅम्प तपासा, त्यांच्या काटेवर किमान फडक्याचा एक हात तरी मारा, मागची पुढची काय स्वच्छ करून घ्या, त्यानंतर कारमध्ये आसनस्थ झाल्यावर आसनाची स्थिती मागे-पुढे करणे, उंची कमी अधिक करणे, मध्यभागी असलेला व कारच्या दोन्ही बाजूला असलेले आरसे नीटपणे जुळवून त्यांचा वापर योग्य होत आहे की नाही, ते पाहाणे. सेंट्रल कन्सोलवर नजर टाकून सारे काही व्यवस्थित आहे की नाही ते कार स्टाटर् करून पाहाणे. थोडी पुढे घेत ब्रेक यंत्रणा यथास्थित आहे की नाही, त्याचा अंदाज घेणे. स्टिअरिंग अॅडजेस्टमेंट, सर्व दरवाजे नीट लागले आहेत की नाही, ते पाहा. इतके तर तुम्हाला करावेच लागते व ते केले पाहिजे. त्यामुळे जेव्हा तुम्ही रस्त्यावर प्रत्यक्षात कार आणता तेव्हा ते काही राहिलेले असेल तर त्या कामाची पूर्तता करण्यासाठी कार थांबवावी लागणार नाही. शक्यतो कार चालू असताना अशा प्रकारच्या कामाची हाताळणी करू नका, त्यासाठी कार बाजूला घेऊन थांबवून ते काम करा. कार वापरण्यासाठी या सर्वसाधारण प्राथमिक तयारीच्या जुळवाजुळवी या महत्त्वाच्या असतात. त्यात जरा कुठे कमी अधिक वाटले तर कार चालवण्यातील आनंद वाटत नाही, काहीतरी चुकल्यासारखे वाटते. यासाठी ड्रायव्हिंग सीटवर बसण्यापूर्वी व कार रस्त्यावर आणण्याआधी न विसरता या जुळवाजुळवीचा, तपासणीचा भाग पूर्ण कराच.