एमजी मोटर्स, व्हिवो या चिनी कंपन्यांनी फसवणूक केली? मोदी सरकारने दिले चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:55 IST2023-12-01T16:47:21+5:302023-12-01T16:55:01+5:30
दोन्ही कंपन्यांनी चिनी सरकारला मोठा फायदा करून दिला असून कर चोरीही केल्याचा आरोप आहे.

एमजी मोटर्स, व्हिवो या चिनी कंपन्यांनी फसवणूक केली? मोदी सरकारने दिले चौकशीचे आदेश
केंद्र सरकराच्या कार्पोरेट प्रकरणांच्या मंत्रालयाने एमजी मोटर्स आणि व्हिवो मोबाईल कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एमजी मोटर्सची चौकशी आरडी ऑफिस तर व्हिवोची चौकशी एसएफआयओ द्वारे केली जाणार आहे. या दोन्ही कंपन्यांच्या मूळ कंपनीच्या हिस्सेदारीबाबतची चौकशी सुरु आहे. या दोन्ही कंपन्यांनी चिनी सरकारला मोठा फायदा करून दिला असून कर चोरीही केल्याचा आरोप आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्रालयाने चायनीज कार उत्पादक एमजी मोटरचे संचालक आणि ऑडिटर डेलॉईस यांना कंपनीच्या रजिस्ट्रारमार्फत बोलावून चौकशीत आढळलेल्या अनियमिततेबाबत स्पष्टीकरण मागवले होते. तर व्हिवो मोबाईलच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. यावेळी कस्टम ड्युटी न भरल्याचे निदर्शनास आले होते. या दोघांवर चीन सरकारला पैसे पाठवल्याचा आरोप आहे. या प्रकरणांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
एमजीला 2019-20 या आर्थिक वर्षात मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले होते. याचे कारण भारत सरकारने विचारले होते. यानंतर सरकारने कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली होती. तपासात संशयास्पद व्यवहार, करचोरी, बिलिंगमधील अनियमितता आणि अन्य बाबी उघड झाल्या होत्या. दुसरीकडे ऑटो कंपनीने नियमांचे पालन केल्याचा दावा केला होता. तसेच कोणत्याही ऑटो कंपनीला पहिल्या वर्षी नफा मिळवणे कठीण आहे, असेही म्हटले होते.
व्हिवो मोबाईल इंडिया कंपनी कस्टम ड्युटी न भरता मोठ्या प्रमाणावर चीनमधून वस्तू आणि उपकरणे भारतात आणत आहे. Vivo ने आतापर्यंत सुमारे 2217 कोटी रुपयांची कस्टम ड्युटी चुकवली आहे.