तब्बल 28 चे मायलेज, तरीही मारूती सुझुकीने बंद केली सियाझ हायब्रिड कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 10:53 AM2019-08-20T10:53:39+5:302019-08-20T10:54:17+5:30
मारुतीने नुकतीच 1.3 लीटर डिझेल इंजिनची अर्टिगा कार बंद केली होती.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी अगदी गेल्या वर्षीपर्यंत विक्रीच्या उच्चांकांमुळे चर्चेत होती. आता विक्री घटल्यानेही चर्चेत आली आहे. मंदीमुळे जवळपास 3 हजार लोकांना कमी करणाऱ्या मारुतीने आता त्यांच्या ताफ्यातील कारची काही मॉडेलही बंद करण्यास सुरूवात केली आहे.
मारुतीने नुकतीच 1.3 लीटर डिझेल इंजिनची अर्टिगा कार बंद केली होती. आता कंपनीने सर्वाधिक मायलेज देणाऱ्या सियाझ कारचे हायब्रिड व्हेरिअंटच बंद केले आहे. ही कार तिच्या श्रेणीतील अन्य कंपन्यांच्या कारपेक्षा सर्वाधिक म्हणजे 28 किमीचे मायलेज देते.
मारुतीने या कारमधील 1.3 लीटरचे इंजिन हटविले आहे. आता सियाझमध्ये या इंजिनाची जागा नवे 1.5 लीटरचे इंजिन घेणार आहे.
केंद्र सरकार येत्या एप्रिलपासून बीएस ६ सुरक्षा आणि इंधन प्रणाली लागू करणार आहे. यामुळे जुने 1.3 लीटरचे इंजिन यामध्ये बसत नव्हते. यामुळे पुढील काळात बलोनो, इग्निस, स्विफ्ट या कारमधील इंजिनेही बंद होणार आहेत. नवीन इंजिने परवडत नसल्याने मारुती या गाड्यांमध्ये केवळ पेट्रोल इंजिने विकणार आहे. सियाझमध्ये आता केवळ 1.5 लीटर हायब्रिड मॉडेल उपलब्ध असणार आहे.
मारुती सुझुकीने नुकतीच नवीन लांबलचक अर्टिगा लाँच केली होती. या कारला ग्राहकांचा मोठा प्रतिसादही मिळत होता. मात्र, कंपनीने अर्टिगाचे डिझेल इंजिन प्रकाराचे मॉडेल बंद केले आहे. मारुतीने पेट्रोल, सीएनजी प्रकारासोबत डिझेलच्या दोन इंजिनांचे पर्याय लाँच केले होते. यामध्ये 1.3 लीटर आणि 1.5 लीटर इंजिन होते. भविष्यात सुरू होणाऱ्या बीएस-6 मानकांमुळे मारुतीवर बंधने आली आहेत. यामुळे ओम्नी, जिप्सीसारख्या गाड्या मारुतीला बंद कराव्या लागल्या आहेत. जिप्सी कार नव्या रुपात येण्याची शक्यता आहे.