सीएनजी की इलेक्ट्रीक कार घेऊ? बजेटपेक्षा कोणती परवडेल याचे गणित जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 04:55 PM2021-12-23T16:55:50+5:302021-12-23T17:07:35+5:30
देशातील वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी CNG किट असलेली वाहने बाजारात आली. पण, आता एकामागून एक चांगल्या इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होत आहेत.
नवी दिल्ली: देशातील वाहनांचेप्रदूषण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी CNG किट असलेली वाहने बाजारात आली. या सीएनजी कारमध्येही प्रदूषण होतेच. पण, आता एकामागून एक चांगल्या इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होत आहेत. यामुळे आता फक्त पर्यावरणपूरकच नाही, तर किफायतशीर कार खरेदी करणे, काळाची गरज आहे.
CNG आणि Electric मध्ये कोणती स्वस्त?
जेव्हा तुम्ही कार घेण्याचे करता तेव्हा कारची किंमत हा एक महत्वाचा विषय असतो. सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारमध्ये CNG कार नक्कीच स्वस्त आहे. सध्या मारुती आणि ह्युंदाई सारख्या कार कंपन्या त्यांच्या अनेक मॉडेल्समध्ये फॅक्टरी फिट सीएनजी किट देतात. त्यांची किंमत समान मॉडेलच्या पेट्रोल किंवा डिझेल कारपेक्षा जास्त नाही. मारुती अल्टोची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत रु.3.49 लाखांपासून सुरू होते, तर CNG मॉडेलची किंमत रु.4.76 लाखांपासून सुरू होते. याशिवाय, तुम्ही तुमच्या कोणत्याही वाहनात 50 हजार ते 1 लाख रुपये खर्च करुन सीएनजी किट बसवू शकता.
इलेक्ट्रीक कारच्या किमती जास्त
सध्या देशात केवळ मर्यादित श्रेणीतील इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध आहेत. तसेच, यातील बहुतेक इलेक्ट्रिक वाहने केवळ प्रीमियम किंवा 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत उपलब्ध आहेत. Tata Nexon EV, देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार, 14.24 लाख रुपयांपासून सुरू होते. तर त्याच्या पेट्रोल व्हर्जनची किंमत 7.29 लाख रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे निश्चितच महागडे आहे.
सीएनजी किंवा इलेक्ट्रिकमध्ये कोणते अधिक किफायतशीर आहे?
चालवण्याचा आणि देखभालीचा खर्च कमी असेल, अशी कार अधिक किफायतशीर आहे. त्यामुळे फॅक्टरीत बसवलेल्या सीएनजी किट गाड्यांचे मायलेज एक किलो गॅसमध्ये सुमारे 30 किलोमीटर आहे. सध्या दिल्लीत सीएनजीची किंमत 53 रुपये प्रति किलो आहे. अशा स्थितीत सीएनजी कार चालवण्यासाठी देखभाल खर्चासह सुमारे तीन ते चार रुपये प्रति किलोमीटर इतका खर्च येतो. मात्र, ते पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या तुलनेत खूपच कमी आहे. कारण त्यांचा खर्च अनुक्रमे 10 रुपये आणि 8 रुपये प्रति किलोमीटर आहे.
किती खर्च येतो ?
दुसरीकडे, इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत, दिल्लीतील सार्वजनिक ठिकाणी बसवलेल्या उच्च क्षमतेच्या इलेक्ट्रिक वाहन चार्जरसाठी सरकारने प्रति युनिट 4.5 रुपये दर निश्चित केला आहे. देखभाल खर्चासह जरी ग्राहकाला प्रति युनिट 6 रुपये मोजावे लागले, तर 150 किमीपर्यंत जाणाऱ्या कारची बॅटरी चार्ज करण्यासाठी 16 युनिट वीज लागेल. अशा प्रकारे, इलेक्ट्रिक कार चालवण्याचा खर्च प्रति किलोमीटर 1 रुपये पेक्षा कमी असेल.
पर्यावरणासाठी कोणते वाहन चांगले?
पेट्रोल आणि डिझेल वाहनांना पर्याय म्हणून सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे. या दृष्टीकोनातून पाहिले तर पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी वाहने उत्सर्जन कमी करू शकतात, परंतु इलेक्ट्रिक वाहने शून्य उत्सर्जन करतात. तथापि, सीएनजी वाहनाचा फायदा असा आहे की इंधन संपल्यावर ते पेट्रोल किंवा डिझेलवर स्विच केले जाऊ शकते, तर इलेक्ट्रिक वाहनामध्ये अशी सुविधा उपलब्ध नाही.