जलमय रस्त्यांवरच्या वाहनांची स्थितीही झाली पूरग्रस्तांसारखी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 03:00 PM2017-08-31T15:00:00+5:302017-08-31T15:00:00+5:30
मुंबईत मंगळवारी २९ ऑगस्टला जोरदार पावसामुळे सारे रस्ते, शहराचा सारा परिसर जलमय झाला. जणू महापुरासारखाच धक्का बसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले २००५ मधील २६ जुलैच्या महापुरासारखी आठवण अनेकांना झाली.
मुंबईत मंगळवारी २९ ऑगस्टला जोरदार पावसामुळे सारे रस्ते, शहराचा सारा परिसर जलमय झाला. जणू महापुरासारखाच धक्का बसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले २००५ मधील २६ जुलैच्या महापुरासारखी आठवण अनेकांना झाली. रस्त्यावर तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचलेले होते, काही ठिकाणी त्याहूनही जास्त पाणी होते. अनेक मोटारसायकल व स्कूटरचालक त्याही परिस्थितीत आपल्या वाहनांना पाण्यातून नेत होते.कमी ग्राऊंड क्लीअरन्स असणाऱ्या कार्सही या पाण्यामधून मार्गक्रमण करीत होत्या.वास्तविक रस्त्याचा अंदाज नसतानाही आपली वाहने अशा खोल पाण्यात घालण्याचे धाडस केले गेले, त्यात काही पारही झाले काही वाहने फसली. खरे म्हणजे अशा प्रकारच्या परिस्थितीत अतिशय गांभीर्याने विचार करून वाहन चालकांनी जलमय रस्त्यात आपली वाहने घालण्याऐवजी एकंदर स्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करायला हवे होते. किमान मोटारसायकल व स्कूटर्ससारख्या वाहनांनी वाहने अशा रस्त्यांमध्ये चालवायला नकोत.
ज्यांची वाहने जलमय रसत्यांवर उभी होती, त्यांची अपरिहार्यता एकवेळ समजू शकते. मात्र आता जलमय रस्त्यांमध्ये वाहने घातल्यानंतर ड्राईव्ह करताना करावी लागणारी कसरत, अनपेक्षित धोके आदी बाबींचा विचार करणे खरे म्हणजे प्रत्येक वाहन चालकाने ती मॅच्युरिटी दाखवायला हवी. असेच नव्हेत तर अन्य अशाच प्रकारच्या आपत्तींमध्ये आपली सुरक्षा व वाहनाचीही सुरक्षा ही महत्त्वाची असते, हे समजून घेणे गरजेचे असते. आता या जलमय मुंबापुरीच्या स्थितीमुळे ज्यांच्या कार बिघडल्या आहेत,त्यांना गॅरेजला न्यायला लागतीलच पण ज्यांनी जलमय रस्त्यातूनही रस्ता पार केला असेल, त्यांनाही आपली गाडी नीट तपासून, घ्यावी लागणार आहे. मोटारसायकलींची तर तीन फूट पाण्यात जाण्याने झालेली स्थिती नीट लक्षात घेऊन सारी यंत्रणा तपासून व साफसूफ करून घ्यावी लागणार यात शंका नाही. सांगायचा मुद्दा इतकाच की आता या जलमय स्थितीमुळे झालेले नुकसान व संभाव्य नुकसान प्रत्येक वाहन चालक, मालकाने नीट समजून त्यावर नीट उपचार करायला हवेत.
स्थिती पूर्ववत झाल्यानंतर पहिली कामगिरी आता तीच करावी लागणार आहे. सर्व्हिसिंग, पूर्णपणे तपासणी, तेलपाणी सारे काही पाहावे लागणार आहे. एकंदर काय वाहनांची अवस्था तूर्तास तरी पूरग्रस्तांसारखी असणार आहे. त्यांना सावरण्यासाठी कामे करावी लागणार हे नक्की. शहरांमधील अनेकांची वाहने ही दैनंदिन वापरासाठी असणारी अत्यावश्यक साधनेच बनलेली आहेत. पण ती नीट व ठाकठीक असल्याची खात्री केल्याविना वापरू नयेत इतकेच.