विविध कंपन्यांच्या गाड्या महागणार असल्याने ग्राहकांना बसणार झटका; वर्षभरातील तिसरी भाववाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 08:59 AM2021-08-31T08:59:21+5:302021-08-31T08:59:49+5:30
वाढलेल्या उत्पादन खर्चाचा परिणाम : वर्षभरातील तिसरी भाववाढ
नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या काळात वाहनांचे सुटेभाग महाग झाल्यामुळे सर्व कार उत्पादक कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत. आता पुन्हा ग्राहकांना भाववाढीचा झटका बसणार आहे. मारुती सुझुकी व टाटा माेटर्सच्या वाहनांच्या किमती सप्टेंबरपासून वाढणार आहेत.
मारुती सुझुकीने या वर्षी तिसऱ्यांदा वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत. कंपनीने सांगितले, की गेल्या वर्षभरात सातत्याने उत्पादन खर्च वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. सप्टेंबरपासून कंपनीचे सर्वच माॅडेल्स महागणार आहेत. नेमकी किती वाढ हाेणार आहे, याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. सध्याच्या गाड्यांमध्ये लागणाऱ्या चिपची किंमत यावर्षी वाढली आहे. त्यामुळेही यापूर्वी भाववाढ करावी लागली हाेती. कोरोना महामारीच्या काळात वाहनांच्या सुट्या भागांचे भाव वाढल्याने ही दरवाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
टाटा माेटर्सचाही भाववाढीचा निर्णय
मारुती सुझुकीप्रमाणे टाटा माेटर्सनेही काही प्रवासी गाड्यांच्या किमती वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सरसकट ०.८ टक्के वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ माॅडेल आणि व्हेरियंटवर अवलंबून राहणार आहे. कंपनीने या निर्णयामागील कारण स्पष्ट केलेले नाही. भाववाढीचे प्रमाण जाहीर केले असले तरी काेणत्या वाहनांच्या किमतीवर किती परिणाम हाेईल, याबाबत माहिती दिलेली नाही.
ग्राहकांसह सर्वांनाच बसणार फटका
यापूर्वी मारुती सुझुकीने जुलैमध्ये स्विफ्ट व इतर माॅडेल्सच्या सीएनजी व्हेरियंटच्या किमतीत वाढ करण्यात आली हाेती. त्यापूर्वी एप्रिलमध्येही काही माॅडेल्सच्या किमती वाढविल्या हाेत्या. तसेच ह्युंदाई, टाटा माेटार्स, महिंद्र आणि महिंद्र, टाेयाेटा, हाेंडा अशा जवळपास सर्वच कंपन्यांनी २०२१ मध्ये गाड्यांच्या किमती वाढविल्या आहेत. ह्युंदाईच्या गाड्यांच्याही किमतीमध्ये ५ ते ३४ हजार रुपयापर्यंत वाढ झालेली आहे. महिंद्र आणि महिंद्रचीही प्रवासी वाहने जुलैपासून ५ ते २८ हजार रुपयापर्यंत महाग झालेली आहेत. त्यामुळे नवीन वाहन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना फटका बसणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.