इंजिन थंड करण्यासाठी कूलन्ट योग्य प्रमाणात हवेच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 06:00 PM2017-09-25T18:00:00+5:302017-09-25T18:00:00+5:30
कारच्या इंजिनाचे तापमान अधिक तप्त होऊ नये त्याचे तापमान स्थिर राहावे, यासाठी कूलन्ट हे द्रावण असते. हिरव्या वा पिवळ्या रंगाचे हे द्रावण बॉनेटमध्ये एका प्लॅस्टिकच्या टाकीत असते. त्यात दिलेला स्तर नेहमी तपासा.
कारच्या इंजिनाचे तापमान हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. विशेष करून उन्हाळ्यामध्ये वाहनाचे इंजिन जशी जशी तुमची कार धावते तेवढे ते अधिक गरम होत असते.हिवाळ्यामध्ये वा पावसात इंजिन गरम होण्याचे प्रमाण तसे कमी असते. इंजिनाची गरम होण्याची क्रिया ही तुम्ही तुमचे वाहन ज्या पद्धतीने हाताळत असता त्यावरही असते पण त्याचबरोबर त्याचे गरम होणे हे तुम्ही ज्या हवामानामध्ये कार चालवता, त्या हवामानावरही बरेच काही अवलंबून असते. अर्थात ते इंजिन शक्य त्या स्तरापर्यंत गरम राहावे,त्याच्यापलीकडे ते गरम होऊ नये यासाठी कूलन्ट हे महत्त्वाच द्रावण आहे. Antifreeze असेहीत्याला म्हणतात. अॅन्टी फ्रीज अथवा कूलन्टचे द्रावण हे कारच्या बॉनेटमध्ये एका प्लॅस्टिकच्या छोट्या टाकीवजा डब्यात त्यामध्ये दर्शवलेल्या खुणेपर्यंत टाकावा लागते.अर्थात अति उन्हाळा असेल तर ते कूलन्टही काही काम करीत नाही, अशावेळी कार बाजूला लावणे व बंद करणे किमान इंजिन थंड होईपर्यंत इंजिन चालू न करणे हेच महत्त्वाचे असते.
पूर्वीच्या काळी कूलन्टचा वापर होत नव्हता तेव्हा कारमध्ये पाणी टाकले जायचे. अर्थात पाण्यालाही काही मर्यादा असते. त्यानंतर पाणीही गरम झाले की ते कूलन्टच्याऐवजी उपयोगाचे राहात नाही. कूलन्ट हा प्रकार अस्तित्वात आल्याने कारच्या इंजिनाला थंड राखणाऱ्या द्रावणाची मोठी सोय झाली आहे. इंजिनाला अति उष्ण होण्यापासून रोखण्यासाठी कूलन्ट हा सर्वात चांगला मार्ग आहे. पिवळ्या वा हिरव्या चमकदार रंगाचे हे द्रावण असते.ethylene glycol or propylene glycol यापासून ते तयार केलेले असते. हे घटक व पाणी यांचे ५०-५० टक्के हे मिश्रण असते, असे जाणकार सांगतात.
या मिश्रणाने धावत्या गाडीचे इंजिन जे गरम होत असते, त्या इंजिनाला थंड राखण्याचे काम करणआरे हे कूलन्ट कारच्या त्या प्लॅस्टिक टाकीत एका विशिष्ट प्रमाणात दर्शवलेल्या रेषेच्या मापामध्ये कायम आहे की नाही, ते नेहमी लांबच्या प्रवासात पाहा. विशेष करून उन्हाळ्यामध्ये हे कूलन्ट कमीही होत असते. कूलन्टचा तो स्तर शक्यतो कायम राखा. कूलन्टचा हा स्तर राखण्यासाठी काही जण पाणी टाकतात. ही कृती तात्कालिक कारणासाठी काही वेळेपर्यंत ठिक असते. मात्र कायमस्वरूपी तसे करणे सध्याच्या इंजिनांच्यादृष्टीने अयोग्य आहे.
त्यामुळे कारच्या कूलन्टची मर्यादा त्या टाकीवर दर्शवलेली असेल तर ती राखा. कूलन्ट कमी होणे व इंजिन गरम होणे या साधारण संलग्न क्रिया आहेत. इंजिन अधिक त्पत होत असेल तर आजच्या कारमध्ये त्याचे इंडिकेशन तुम्हाला डॅशबोर्डवरील इलेक्ट्रॉनिक पॅनेलमध्ये दिसते. त्यामुळे बॉनेट न उघडताही कारच्या इंजिनचा तप्तपणा वा कूलन्ट तपासण्यासाठी संकेत असतात. तेव्हा कूलन्टचा स्तर कमी तर तो तपासा. अन्यथा काही वेळ थांबून इंजिन थंड होऊ द्या. कूलन्ट विकत घ्या व मग पुढच्या लांबच्या प्रवासाला जा. त्यातही काही अधिक समस्या असेल तर ती कदाचित इंजिनची असेल तर मात्र कार गॅरेजला नेण्याविना गत्यंतर नसेल. अर्थात योग्य नियमित देखभालीने असे प्रसंग फार कमी येतात. तेव्हा लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी कूलन्ट तपासा.