भारतातील कारच्या रचना, सुविधा, सौंदर्य यासाठी हवा भारतीय वातावरणाला साजेसा दृष्टिकोन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 12:00 PM2017-08-21T12:00:29+5:302017-08-21T15:20:09+5:30
गेल्या काही वर्षांमध्ये कारच्या सौंदर्याबाबत, अंतर्गत सुविधा व आरेखन याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. वास्तविक कारमधील कारचे मूळ गुण मात्र कमी करण्याचा प्रयत्न करताना, कारच्या ताकदीमध्ये, सुरक्षिततेबाबत काहीशी नव्हे तर चांगलीच तडजोड होऊ लागली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये कारच्या सौंदर्याबाबत, अंतर्गत सुविधा व आरेखन याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. वास्तविक कारमधील कारचे मूळ गुण मात्र कमी करण्याचा प्रयत्न करताना, कारच्या ताकदीमध्ये, सुरक्षिततेबाबत काहीशी नव्हे तर चांगलीच तडजोड होऊ लागली आहे. याला कारण उत्पादक कंपनीचे कॉस्ट कटिंग जसे कारणीभूत आहे तसेच कारच्या ग्राहकांची मागणीही तितकीच कारणीभूत आहे. साधारणपणे भारतातील मोटारींमध्ये २००० सालापासून विविध बदलांना, स्पर्धेला सुरुवात झाली. ग्राहकांची संख्याही वाढू लागली व त्यामुळे ग्राहकांच्या मतांची पाहाणी, तपासणी केली जाऊन कारच्या रचनेत, सुविधांमध्ये बदल होऊ लागले. परदेशातील कार्स, त्यांचा वेग, त्यामधील सुविधा याबाबत लोकांना वाढत्या इंटरनेट सुविधांमधून माहितीही मिळत गेली. साहजिकच कारमध्ये काय काय सुविधा असतात, ते समजत गेले व ग्राहक विशेष करून नव्या पिढीतील तरुण मोटारींबाबत विशेष चोखंदळपणे पाहू लागले. परदेशी कार, त्यांच्यामधील सुविधा, त्या कंपन्या यासाठी भर देणारा नव्या पिढीतील भारतीय ग्राहक आकर्षित झाला. आयटी कंपन्यांच्या चलतीमुळे खिशात चांगले पैसेही खुळखुळत होते. यामुळे कारमध्ये नवनव्या परदेशी सुविधांचा समावेश केला गेला. पुढे पुढे त्या सुविधा कारच्या श्रेणीनिहाय दिल्या जाऊन त्यातून चांगलेच अतिरिक्त उत्पन्न कार उत्पादक कंपन्यांनी कमावले.
परदेशातील कारप्रमाणेच आपल्यालाही तशीच सुविधा मिळावी, त्याप्रमाणेच सोयी कारमध्ये असाव्यात असा सर्वसाधारण ग्राहकांचा ओढा असतो. कार उत्पादक कंपन्यांनाही तसे पाहिजे असते, त्याद्वारे त्यांना अतिरिक्त सुविधा देत ग्राहकांची संख्या वाढवता येते व तशी किंमतही. परंतु भारतीय परिस्थितीचा, येथील ग्राहकाच्या असलेल्या वापर पद्धतीचा विचार झाला नाही. ग्राहकांना दिल्या गेलेल्या अनेक सुविधांचा वापर करायला आवडतो पण त्या सुविधांचा दर्जा, त्यांचा टिकावूपणा, त्या सुविधांना आवश्यक असलेल्या भारतीय रस्ते, वाहतूक यातील पायाभूत रचना, सुविधा यांचा अभाव असल्याने अशा प्रकारच्या कारमध्ये दिलेल्या उच्च सुविधा काही काळातच खऱाब होऊ लागतात. त्या जपण्यासाठी मात्र अधिक पैसे खर्च करावे लागतात. कसे आहे की परदेशात असलेल्या खाद्यपदार्थांची निर्मिती ही तेथील वातावरणाला अनुसरून असते. परंतु, ते खाद्य भारतातील वातावरणाला अनुकूल असेलच असे नाही. तसेच कारच्या बाबतीतही म्हणता येते. कारसाठी ग्राहकांची मागणी आहे असे दिसल्यानंतर ग्राहकांसाठी परदेशातील कारप्रमाणे विविध सुविधा दिल्या जातात. पण त्या सुविधा येथील खराब रस्ते, ग्राहकांच्या वापरण्याच्या पद्धती, येथील हवामान, येथील वाहतूक रचना यामुळे फार काळ नीटपणे टिकत नाही, काहीवेळा त्यांचा वापर कुचकामी असल्याचेही ग्राहकाला वाटू लागते. खरे म्हणजे कंपन्यांच्या कडून काहीही सादर केले गेले तरी ग्राहकांनीच सजगपणे व डोळसपणे आपल्या कारसाठी नेमके काय हवे आहे, ते लक्षात घेतले पाहिजे. कार हे अद्यापही प्रेस्टिजचे वा अन्य काही उद्दिष्टाचे साधन समजले जात आहे. हे जोपर्यंत चालू राहील, तोपर्यंत आपल्या देशात नेमकी कोणती सुविधा व अंतर्गत रचना, सौंदर्य हे योग्य आहे, याचा अंदाज ग्राहकाला येत नाही, तोपर्यंत कारच्या बाबत असणारे सौंदर्य, सुविधांचे निकष हे कार उत्पादकालाही ठरवता येणार नाहीत. मात्र ग्राहकांच्या या मानसिकतेचा फायदा मात्र कार उत्पादक, अॅक्सेसरीज उत्पादक घेत राहातील. त्यासाठीच कार ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन आहे, हे मूलभूत तत्त्व ग्राहकाला समजेल, तेव्हा भारतीय ग्राहकाच्या कल्पनाही पार बदललेल्या असतील, कदाचित भारतीय वातावरणाप्रमाणे सुविधा व सौंदर्य याबद्दलचा, दर्जा, सुरक्षितता, रस्ते, विविध भागांमध्ये असणारे हवामान यानुसार अवलंबून असलेले आवश्यकतेनुसार कार उत्पादकांनाही आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. नजीकच्या भिवष्यात विद्युत ऊर्जेवर चालणारी वाहने भारतात कशी असावीत, याचाही दृष्टीकोन परदेशातील त्या प्रकारच्या वाहनांच्या तुलनेत बदललेला असेल.