होंडाला सिटीनंतर ग्राहकांनी 'अमेझ' केले; कारला १० वर्षे पूर्ण, विक्रीचा आकडा एवढा की...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 05:02 PM2023-04-05T17:02:19+5:302023-04-05T17:02:44+5:30
होंडाच्या दुसऱ्या कोणत्या कारना एवढे यश जमले नाही ते अमेझ सेदानने मिळवून दिले आहे.
मुंबई : होंडा कार्स इंडिया (एचसीआयएल) ही भारतात प्रिमियम कार्ससाठी एकेकाळी ओळखली जात होती. होंडाच्या सिटीने सर्व श्रीमंतांच्या घराची शोभा वाढविली होती. असे असताना आता होंडाला सामान्य वर्गानेही आश्चर्यचकीत केले आहे. होंडाच्या दुसऱ्या कोणत्या कारना एवढे यश जमले नाही ते अमेझ सेदानने मिळवून दिले आहे.
होंडा कंपनी अमेझचा १० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. ही कार एप्रिल २०१३ मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आली होती. यानंतर या कारचे २०१८ मध्ये फेसलिफ्ट आले होते. या दहा वर्षांत होंडा अमेझच्या ५.३ लाखांहून अधिक कार विकल्या गेल्या आहेत. सध्या देशामध्ये विकल्या जाणाऱ्या प्रत्येक दोन होंडा कार्स पैकी एक कार अमेझ आहे. तसेच होंडाच्या भारतातील एकूण विक्रीमध्ये 53 टक्के वाटा हा या कारचा आहे.
पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये या कारची क्रेझ आहे. अमेझचे ४० टक्के ग्राहक हे पहिल्यांदा कार खरेदी करणारे आहेत. सीव्हीटी ऑटोमॅटिक व्हेरिअंटलाही चांगली मागणी असून सध्याच्या मॉडेलमध्ये याचा वाटा ३५ टक्के आहे. पहिल्या कारची 2.6 लाख युनिट्स विक्री झाली होती. दुसऱ्या पिढीतील अमेझची विक्री २.७ लाखांवर गेली आहे.
होंडाच्या कार राजस्थानमधील तापुकारा प्रकल्पात उप्तादित केल्या जातात. या कार भारतासह दक्षिण आफ्रिका व सार्क देशांमध्ये निर्यात केल्या जातात. अमेझमध्ये १.२ लाटर आय-व्हीटेक पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन व सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हे व्हेरिअंट अनुक्रमे १८.६ किमी आणि प्रतिलिटर १८.३ किमी मायलेज देतात. महत्वाचे म्हणजे हे इंजिन ईथेनॉल मिश्रित इंधनावर देखील चालते. या कारला ग्लोबल एनसीएपीकडून ४-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते.