सायरस मिस्त्रींच्या अपघाताचा परिणाम, आता सीट बेल्ट अलार्म स्टॉपरवर बंदी; सरकार कठोर भूमिकेच्या तयारीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 02:47 PM2022-09-06T14:47:53+5:302022-09-06T14:48:18+5:30
टाटा ग्रूपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता पुन्हा एकदा रस्ते वाहतुकीत प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
नवी दिल्ली-
टाटा ग्रूपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता पुन्हा एकदा रस्ते वाहतुकीत प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रिपोर्टनुसार मिस्त्री यांच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांनी सीट बेल्ट लावला नसल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे केंद्र सरकारला सीट बेल्ट आणि सीट बेल्ट वॉर्निंग सिस्टमशी संबंधित नियमांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडलं आहे. सीट बेल्ट वॉर्निंग सिस्टीम बंद करणाऱ्या सर्व जुगाडांवर सरकार लवकरच बंदी घालू शकतं. भारतातील कार प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून सीट बेल्ट अलार्म स्टॉपर्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती आता समोर आली आहे.
सरकार घेणार मोठा निर्णय
सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय चार महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतं. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, मंत्रालयानं एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये या चार मोठ्या निर्णयांचा उल्लेख करण्यात आला आहे. सीट बेल्ट अलार्म स्टॉपरवर बंदी घालण्यासोबतच परिवहन मंत्रालय कारमध्ये सहा एअरबॅग्ज आणि मधल्या व मागील सीटवर तीन-पॉइंट सीट बेल्ट अनिवार्य करण्याचा निर्णय घेऊ शकतं.
परिवहन मंत्रालय सीट बेल्टचं महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीमही राबवू शकतं. रस्ते सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार हे चार महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतं.
परिवहन मंत्रालय अॅक्शनमोडमध्ये
परिवहन मंत्रालय नव्या रस्त्याच्या डिझाईनसाठी प्रस्तावाचे पुनरावलोकन करू शकतं. जर एखाद्यानं निश्चित केलेले निकष पूर्ण केले नाही तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ते या सर्व गोष्टींसाठी ऑर्डर तयार करत आहेत आणि प्रक्रिया सुरू आहे. अशाप्रकारे सर्व प्रकारच्या सीट बेल्ट क्लिपवर बंदी घालण्याचा आदेशही लवकरच जारी करण्यात येणार आहे.