आता नव्या कारमध्ये ड्रायव्हरसोबतच फ्रंट पॅसेंजर सीटसाठीही एअरबॅग अनिवार्य, म्हणून घेण्यात आला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:26 PM2021-07-01T20:26:04+5:302021-07-01T20:26:04+5:30
Auto News: रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आता आपल्या धोरणात बदल करताना कारमध्ये फ्रंट पॅसेंजरसाठीही एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत.
नवी दिल्ली - आतापर्यंत भारतामध्ये कारनिर्मिती करताना केवळ ड्रायव्हरसिटवरच एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या होत्या. मात्र रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आता आपल्या धोरणात बदल करताना कारमध्ये फ्रंट पॅसेंजरसाठीही एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत. हा नवा नियम लागू करण्यासाठी सरकारने यापूर्वी १ एप्रिल २०२१ची तारीख निर्धारित करण्यात आली होती. मात्र आता ही मुदत २१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच २०२३च्या सुरुवातीपासून सर्व कारनिर्मात्या कंपन्यांना त्यांच्या नव्या कारमध्ये आता फ्रंट पॅसेंजर सीटवरसुद्धा एअरबॅग द्याव्या लागतील. (The decision was taken to make airbags mandatory for the front passenger seat as well as the driver in the new car.)
सरकारकडून नवे नियम बनवण्यात आल्यानंतर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफ्रॅक्चर्सने हा नियम लागू करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत मागितली आहे. सरकारला हा नियम लागू करण्याची आवश्यकता का भासली आणि त्याचे काय फायदे होतील, हे आपण जाणून घेऊयात.
कार चालवतेवेळी ड्रायव्हरचा हात स्टेअरिंगवर असतो. त्यामुळे ड्रायव्हरची पकड मजबूत राहते. तर अॅक्सिडेंट होताना पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीकडे केवळ सीटबेल्टचाच आधार असतो. अॅक्सिडेंट होताना एअरबॅगमुळे ड्रायव्हरचा बचाव होतो. मात्र शेजारी बसलेल्या व्यक्तीचे डोके विंडशिल्डवर आपटू शकते. त्यामुळे गंभीर जखम होऊ शकते. अशा परिस्थितीत पुढे बसलेल्या प्रवाशासाठीही एअरबॅग अॅक्सिडेंट झाल्यास जीवरक्षक ठरू शकते.
वेगाने अॅक्सिडेंट झाल्यास पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीचे डोके जर डॅशबोर्ड किंवा कुठल्याही इतर भागावर आपटले तर गंभीर जखमेमुळे मृत्यू होऊ शकतो. कारचा डॅशबोर्ड हा मजबूत प्लॅस्टिक किंवा वुडन मटेरियपासून बनलेला असतो, त्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते. अशा परिस्थितीत पुढे बसलेल्या दोन्ही व्यक्तींसाठी एअरबॅग असणे अनिवार्य ठरते.