नो टेन्शन! आता दिल्लीत १० वर्षे जुनी वाहने जप्त होणार नाहीत, वाचा 'हा' नवा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 01:35 PM2023-08-23T13:35:18+5:302023-08-23T13:35:54+5:30
परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर आता घरांबाहेर रस्त्यांवर पार्क केलेली अशी वाहने जप्त केली जाणार नाहीत.
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये स्क्रॅप पॉलिसी (Scrap Policy) लागू झाल्यापासून १० वर्षे जुन्या डिझेल किंवा १५ वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांचे मालक चिंतेत आहेत. रस्त्यावर व घरांच्या बाहेर उभी केलेली अशी वाहने स्क्रॅपसाठी उचलण्याची भीती होती. मात्र, आता दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाकडून मोठी बातमी येत आहे.
दिल्लीचे परिवहन मंत्री कैलास गेहलोत (Kailash Gehlot) यांच्याकडून परिवहन आयुक्तांना आदेश देण्यात आला आहे की, हा कालावधी ओलांडलेली वाहने स्क्रॅपसाठी उचलण्यात येऊ नयेत. या आदेशानंतर जुन्या वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर आता घरांबाहेर रस्त्यांवर पार्क केलेली अशी वाहने जप्त केली जाणार नाहीत.
दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाच्या अंमलबजावणी शाखेमार्फत अशी वाहने स्क्रॅपसाठी उचलण्याचे काम सुरू होते. मात्र आता ही वाहने उचलली जाणार नाहीत. मात्र, परिवहन आयुक्त आशिष कुंद्रा यांना दिलेल्या आदेशात ही वाहने रस्त्यावर फिरताना दिसली आणि पकडली गेली, तर त्या वाहनांना हा नियम लागू होणार नाही, असे म्हटले आहे.
थोडक्यात जाणून घ्या स्क्रॅप पॉलिसी?
केंद्र सरकारने लागू केलेल्या स्क्रॅप पॉलिसी अंतर्गत ज्या वाहनाची विहित मुदत पूर्ण झाली आहे किंवा ते वाहन रस्त्यावर चालवले जात आहे, तेच वाहन स्क्रॅपसाठी उचलले जाऊ शकते. रस्त्यावर उभी असलेली वाहने, जी निरुपयोगी झाली आहेत किंवा प्रदूषण करणारी वाहने उचलली जाऊ शकतात. मात्र, स्क्रॅपिंग एजन्सी चांगल्या स्थितीत असेलेली वाहने उचलू शकत नाही.