अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांची मागणी वाढणार; ग्लोबल रिसर्चचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 06:40 AM2021-10-18T06:40:30+5:302021-10-18T06:42:52+5:30
येत्या काही दिवसांमध्ये अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणे ज्या वाहनांच्या मेन्टेनन्सचा खर्च कमी येतो, त्यांनाही ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.
नवी दिल्ली : गेल्या १५ महिन्यांमध्ये देशातील पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये ३५ टक्के वाढ झाली असून, हा खर्च खिशाला परवडेनासा झाल्यामुळे ग्राहक आता अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांचा शोध घेऊ लागले आहेत. परिणामी येत्या काही दिवसांमध्ये अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणे ज्या वाहनांच्या मेन्टेनन्सचा खर्च कमी येतो, त्यांनाही ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.
एचएसबीसी ग्लोबल रिसर्च रिपोर्टनुसार देशातील इंधनाचे वाढते दर हे सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. यामुळे ज्यांच्याकडे सध्याचे वाहन आहे, त्यांना त्याचा खर्च परवडेनासा झाला आहे, तर नवीन वाहन खरेदी करू इच्छिणारे लोक हे अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनाला पसंती देत आहेत. याशिवाय
ज्या वाहनांना मेन्टेनन्स कमी लागतो, त्यांनाही मागणी वाढत आहे. १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे वाहन खरेदी करणाऱ्यांचा या अहवालात अभ्यास करण्यात आला असून, त्यांच्याकडून या दोन्ही बाबींना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून आले आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर विमान इंधनापेक्षा जास्त
देशातील पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असून, ते विमानाच्या इंधनापेक्षा ३० टक्क्यांनी जास्त झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये होत असलेली वाढ चालूच असून रविवारी या दोन्ही इंधनांचे दर ३५ पैसे प्रति लीटर असे वाढविण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १११.७७ रुपये प्रति लीटर झाले असून डिझेलही लीटरला १०२.५२ रुपयांवर पोहोचले आहे.
सध्या दिल्लीमध्ये विमानाच्या इंधनाचे दर ७९,०२०.१६ रुपये प्रति किलोलीटर असे आहेत. याचा अर्थ एका लिटरला या इंधनाचा दर ७९ रुपये आहे. मात्र, आता दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर १०५.८४ रुपये प्रति लिटर झाला आहे. याचाच अर्थ पेट्रोल विमानाच्या इंधनापेक्षा ३० टक्क्यांनी महाग आहे.
या दरवाढीमुळे आता सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या पुढे गेले आहे. तसेच किमान डझनभर राज्यांमध्ये डिझेलच्या दराने शतक पार केले आहे. गेल्या तीन सप्ताहांमध्ये पेट्रोलच्या दरात १६व्या तर डिझेलमध्ये १९ व्या वेळी वाढ झाली आहे.