मारुतीच्या छोट्या कारची मागणी थंडावली; बाजारातील ट्रेंड समजायचा की आणखी काय?...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 01:07 PM2023-08-02T13:07:26+5:302023-08-02T13:08:09+5:30
मारुतीच्या पोर्टफोलिओमध्ये अल्टो, एस प्रेसो, सेलेरिओ, स्विफ्ट सारख्या कार आहेत.
देशात थोरापासून ते सामान्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीची कार ठरलेल्या मारुती सुझुकीची गेल्या वर्षीच्या तुलनेत यंचा विक्री वाढली आहे. परंतू, खरेदीदारांचा जो ट्रेंड आहे त्यावरून मारुतीच्या छोट्या एन्ट्री लेव्हल गाड्यांची मागणी आता थंडावत चालली असल्याचे दिसत आहे.
मारुतीच्या पोर्टफोलिओमध्ये अल्टो, एस प्रेसो, सेलेरिओ, स्विफ्ट सारख्या कार आहेत. जुलै २०२३ मध्ये मारुतीने एकूण 159,431 कार विकल्या आहेत. गेल्या जुलैमध्ये मारुतीने 155,605 कार विकल्या होत्या. ही विक्री वाढली असली तरी छोट्या गाड्यांच्या विक्रीचा आकडा विचार करायला लावणार आहे.
ज्या कारची सर्वाधिक डिमांड होती, त्या अल्टो, स्विफ्ट, इग्निस आणि एस प्रेसो, सेलेरिओची विक्री घसरून 76,692 यूनिट्स झाली आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये याच कारनी 105,151 विक्री नोंदविली होती. आता छोट्या कारवरून लोक मोठ्या कारकडे जाऊ लागल्याचे बाजारातील ट्रेंड सांगत आहे. शिवाय या छोट्या कारच्या किंमतीही आता पाच लाखांच्यावर जाऊन पोहोचल्या आहेत.
कंपनीने जुलै महिन्यात अल्टो आणि एस-प्रेसोच्या एकूण 9,590 युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी ही विक्री 20,333 युनिट्स होती. कॉम्पॅक्ट कारमध्ये समाविष्ट असलेल्या बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस, स्विफ्टच्या विक्रीत 21% घट झाली आहे. हॅचबॅक कारऐवजी स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) वाहनांकडे ग्राहकांचे आकर्षण वाढत आहे. कंपनीच्या मारुती ब्रेझा, विटारा, जिमनी, एस-क्रॉस आणि एर्टिगा या कारची विक्री 62,049 युनिट्स एवढी झाली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात 23,272 युनिट्स होती.