विचित्र प्रसंग! चालत्या कारमध्ये चालक अडकला; पोलिसांनी शेवटी अपघात घडवून बाहेर काढला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 11:25 AM2023-10-11T11:25:27+5:302023-10-11T11:25:47+5:30
कार चालतच असल्याने तो कारमधून बाहेरही उडी मारू शकत नव्हता. पोलिसांनी त्याला काच उघडून चावी बाहेर फेकण्यास सांगितले... पण काही फायदा नाही...
ब्रिटिश व्यक्तीच्या दाव्याने एमजी मोटर्सला धक्का बसला आहे. एमजीची इलेक्ट्रीक कार झेडएस ईव्हीने त्याला मोठ्या समस्येमध्ये टाकले होते. चालत्या झेडएस ईव्हीमध्ये अचानक खराबी आल्याने त्याला पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिसांनी आणि त्याने बराच प्रयत्न केला. परंतू, कार नियंत्रणात येत नसल्याने अखेर पोलिसांनी आपल्याच एका कारने या कारला अपघात करत या व्यक्तीची सुटका केली आहे.
या थरारक घटनेचे वृत्त बीबीसीने दिले आहे. युकेच्या ग्लासगोमध्ये राहणाऱ्या व्यक्तीसोबत ही घटना घडली आहे. तो त्याची एमजी झेडएस एसयुव्ही चालवत होता. हायवेवर त्याचा वेग ताशी ४८ किमी होता. तेव्हा अचानक कारच्या ब्रेक पॅडलमधून काहीतरी घासण्याचा आवाज येऊ लागला. यावेळी कारचे ब्रेक काम करत नव्हते, असा दावा त्याने केला आहे.
कार चालतच असल्याने तो कारमधून बाहेरही उडी मारू शकत नव्हता. कार चालविता येत होती, परंतू ब्रेक काम करत नव्हते. यामुळे तो रोखू शकत नव्हता. त्याने लगेचच आपत्कालीन सेवेला फोन करून मदत मागितली. एक दोन नाही तर त्याच्या मदतीला तीन पोलीस वाहने आली. पोलिसांनी त्याला काच उघडून चावी बाहेर फेकण्यास सांगितले. तसेच इग्निशन बटन खूप वेळ दाबून धरण्यास सांगितले.
चालकाने तसे केलेही, परंतू त्याने काहीच फायदा झाला नाही, एसयुव्ही पुढे चालत राहिली होती. शेवटी पोलिसांनीच आपले एक वाहन कारच्या आडवे घालत अपघात करवला आणि कार थांबविली. या साऱ्या प्रकरणाची एमजी मोटर यूकेची टीम वाहनाचे निरीक्षण करत असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे.
सामान्य ब्रेक निकामी झाल्यास, EPB स्विच वर खेचून आणि धरून MG ZS EV च्या इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकचा वापर करून आपत्कालीन ब्रेकिंग केले जाऊ शकते. ड्रायव्हरने एसयूव्ही थांबवण्याचा प्रयत्न केला की नाही हे स्पष्ट नाही.