Ducati Monster SP: एकदा पाहाल तर पाहातच राहाल; Ducati ने भारतात लॉन्च केली दमदार 'मॉन्सटर बाइक'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 01:38 PM2023-05-03T13:38:07+5:302023-05-03T13:38:56+5:30
इटालियन कंपनी Ducati ने आपली दमदार Monster SP भारतात आणली आहे.
Ducati Monster SP: इटलीतील आघाडीची दुचाकी कंपनी Ducati ने आपली प्रसिद्ध बाइक Monster SPचे नवीन अपडेटेड मॉडेल भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहे. आकर्षक लुक आणि दमदार इंजिन क्षमता असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत 15.95 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने या बाईकमध्ये काही नवे बदल केले आहेत, ज्यामुळे या बाईकची स्पर्धा सेगमेंटमधील ट्रायम्फ स्ट्रीटशी असेल.
Ducati Monster SP मध्ये नवीन काय?
अपडेटेड डुकाटी मॉन्स्टर एसपी बद्दल बोलायचे झाले तर, ही डिझाईनच्या बाबतीत स्टँडर्ड मॉडेलसारखीच आहे. यात मोटोजीपी प्रेरित ब्लॅक-आउट भाग आणि पॅसेंजर सीट काउल मिळेल. याशिवाय प्रोजेक्टर स्टाईल हेडलाइट्स, LED डे टाईम रनिंग लाईट, लहान फ्लाय स्क्रीन, इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटरसह मस्क्यूलर फ्युएल टँकमुळे बाईकचा लूक आणखी चांगला होतो. कंपनीने यात स्टेप-अप सीट आणि ट्विन एक्झॉस्ट (सायलेन्सर) दिले आहेत. या व्यतिरिक्त यात 17-इंच अलॉय व्हील आहेत, ज्यामुळे गाडीची साइड प्रोफाइल आकर्षक बनते.
कंपनीचा दावा आहे की, ही बाईक हाय-स्पेसिफिकेशन हार्डवेअरसह येते. यात ओहलिन्सकडून घेतलेले 43 मिमी NIX अपसाइड-डाउन फ्रंट फॉर्क्स सस्पेंशन आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन आहे. हाय स्पीडमध्ये तात्काळ ब्रेकिंग लावण्यासाठी यात 320 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.
पॉवर आणि परफॉर्मेंस:
Monster SP मध्ये कंपनीने 937cc क्षमतेचे ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन वापरले आहे, जे 9,250rpm वर 111hp पॉवर आणि 6,500rpm वर 93Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या बाईकचे एकूण वजन 166 किलो आहे आणि कंपनी त्यात 14 लीटरची इंधन टाकी देत आहे.