Maruti नं हजारों गाड्या परत मागवल्या, बिघाडामुळं घेण्यात आला मोठा निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 21:12 IST2022-04-06T21:12:04+5:302022-04-06T21:12:55+5:30
काही वाहनांच्या चाकांवर 'व्हील रिम साईजचे चुकीचे मार्किंग' करण्यात आली असेल तर, ती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Maruti नं हजारों गाड्या परत मागवल्या, बिघाडामुळं घेण्यात आला मोठा निर्णय!
मारुती सुझुकी इंडियाने त्यांची 19731 Eeco वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. यांपैकी काही वाहनांच्या चाकांवर 'व्हील रिम साईजचे चुकीचे मार्किंग' करण्यात आली असेल तर, ती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
19 जुलै 2021 ते 5 ऑक्टोबर 2021 दरम्यान तयार झालेल्या EECO च्या काही गाड्यांमध्ये, व्हील रिमचा आकार चुकीच्या पद्धतीने मार्क झाल्याचे मारुती सुझुकीला आढळून आले आहे. मात्र, यामुळे गाडीच्या कार्यक्षमतेवर अथवा सुरक्षिततेवर कसलाही परिणाम होत नाही.
गाड्यांच्या किमती वाढविण्याची घोषणा -
मारुती सुझुकी इंडियाने कंपनीने म्हटले आहे की, इनपुट कॉस्ट वाढल्याने वाहनांच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे, याचा काही भार ग्राहकांवर टाकावा लागणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या महिन्याच्या अखेरीस किंमती वाढवण्याचा प्लॅन आहे. किमतीतील वाढ वाहनाच्या मॉडेलवर अवलंबून असेल.
वर्षभरात चार वेळा वाढले भाव -
मारुती सुझुकीने गेल्या एका वर्षात चार वेळा आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. कमोडिटीच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे कंपनीने गेल्या वर्षभरात आपल्या वाहनांच्या किमती जवळपास 9 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
खर्चात वाढ झाल्यामुळे मार्जिनवर परिणाम -
कोणत्याही कार निर्मात्यासाठी इनपुट खर्च अत्यंत महत्त्वाचा असतो. कोणत्याही मूळ उपकरणाच्या निर्मात्यासाठी साहित्याचा खर्च हा एकूण खर्चाच्या 70 ते 75 टक्के असतो, परंतु मारुती सुझुकीसाठी तो 80.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यामुळे कंपनीच्या मार्जिनवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच मारुती सुझुकीला किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे म्हटले जात आहे.