सरकारी शिरस्त्याप्रमाणे नेमेची येतो पावसाळा अन् रस्त्यांचे वाजती बारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 08:00 AM2017-08-29T08:00:00+5:302017-08-29T08:00:00+5:30

रस्त्यांवरील खड्डे व त्यामुळे होणारे सर्व त्रास पचवण्यासाठी वाहन व माणसांचे नुकसान टाळण्यासाठी सावध ड्रायव्हिंग आवश्यक आहे.

during rainy season roads are full of potholes | सरकारी शिरस्त्याप्रमाणे नेमेची येतो पावसाळा अन् रस्त्यांचे वाजती बारा

सरकारी शिरस्त्याप्रमाणे नेमेची येतो पावसाळा अन् रस्त्यांचे वाजती बारा

Next
ठळक मुद्देपावसाळ्यात वाहन चालन करायचे म्हटले की वेगळे काही संकेत, धोके लक्षात घेऊन जबाबदारीने वाहन हाताळावे लागते.रजांमध्ये लांबच्या टूरवर जाणाऱ्यांना आपल्या मोटारीच्या आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी.

नेमेचि येतो मग पावसाळा, या उक्तीप्रमाणे दरवर्षी येणारा पाऊस व त्यामुळे रस्त्यांना अनेक ठिकाणी पडणारे खड्डे व भेगा यामुळे शहरातील रस्ते, राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग या ठिकाणी रस्त्यांची मोठी वाताहत लागते. मात्र त्यातून प्रशासन किती शहाणपण शिकते, रस्ते चांगल्या पद्धतीने मोठ्या पावसातही खराब होणार नाहीत, यासाठी काय काळजी घेत असते हा या लेखाचा भाग नाही. पण त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या वाहनांची काळजी ते वाहन त्या रस्त्यावरून नेताना घ्यावी लागते. ती काळजी घेतली नाही, तर वाहनाचे नुकसान, त्याचे आयुष्य कमी होण्याकडे होणारी वाटचाल, वाहनांच्या सस्पेंशनची होणारी तोडमोड, टायर्स, व्हील यांना बसणारे धक्के व त्यामुळे होणारे तोटे इतकेच नव्हे तर प्रवासांना होणारा त्रास व ड्रायव्हरला दाखवावी लागणारी कुशलता या सर्वाचा वपिचार करून वर्तन करावे लागते. विशे, करून या साऱ्याला वाहन चालवताना खरे तोंड द्यावे लागते ते ड्रायव्हर्सना.
पावसाळ्यात वाहन चालन करायचे म्हटले की वेगळे काही संकेत, धोके लक्षात घेऊन जबाबदारीने वाहन हाताळावे लागते. तर पावसाळा संपल्यानंतरही खराब रस्त्यांमुळे आणखी काही नवे धोके निर्माण होत असतात. वाहनाबरोबरच वाहनचालक, प्रवासी यांना रस्त्याचा अनुभव घेताना जीव मेटाकुटीला येत असतो. अशा या रस्त्यांवर चारचाकी मोटार मग ती छोटेखानी हॅचबॅक असो किंवा एसयूव्ही प्रकारातील गाडी असो. बस असो वा ट्रक असो एकंदरच पावसाळ्यापेक्षाही अधिक कटकटींना तोंड द्याावे लागते. किंबहुना पावसाळा झाला आता बाहेरगावी जायला हरकत नाही असे म्हणून मोटारींचे सर्व्हिसिंग करून लांबच्या पल्ल्यावर जाणारे अनेकजण मोठ्या हिरीरीने मोटार लांबच्या पल्ल्यावर नेण्यासाठी घराबाहेर काढतात पण मोटार चालविण्याचे सुख सोडाच उलट शॉकअब्स खराब होणे, पाटे तुटणे इतकेच नव्हे तर अंतर्गत भागात असणारे सुशोभनीय प्लॅस्टिक खिळखिळे होण्याचे प्रकारही अनुभविणे नशिबी येते.
थोडक्यात पावसाळ्या इतक्याच पण त्यापेक्षा काहीशा वेगळ्या कटकटींना वाहन चालक-मालकांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यानंतरच्या सणांना घेतल्या जाणाऱ्या रजांमध्ये लांबच्या टूरवर जाणाऱ्यांना आपल्या मोटारीच्या आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी. त्यासाठी मुळातच वाहन चालविताना रस्त्यांची दुर्दशा लक्षात घ्यायला हवी. अतिशय सावधपणे वाहन चालवणे, खड्ड्यांमधून जाताना सस्पेंशनला अवावश्यक हादरा बसणार नाही, अशा बेताने मोटारीचा वेग नियंत्रित ठेवावा. पाणी साचलेल्या ठिकाणी नेमका किती खड्डा असेल, य़ाची कल्पना करू नये तर तेथे खड्डा असेल असे गृहित धरूनच कारचा वेग कमी करावा. रात्रीच्यावेळी तर रस्त्यांच्या या स्थितीची कल्पना नीट येत नाही, यासाठी अतिशय सावधपणे ड्रायव्हिंग करणे गरचेचे असते. रस्त्याच्या स्थितीबद्दल अनभिज्ञपद्धतीने ड्रायव्हिंग करीत कारचा वेग ठेवणे म्हणजे आपल्या वाहनावरचे नियंत्रण गमावण्याचीही भिती असते. यासाठी पावसाळा व पावसाळ्यानंतरही ड्रायव्हिंगचे कौशल्य अधिकाधिक दाखवावे लागते हे प्रत्येक वाहन चालवणाऱ्याने लक्षात घेतले पाहिजे.

Web Title: during rainy season roads are full of potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.