E-Vehicles: ईलेक्ट्रीक वाहने पुढील वर्षी महागण्याची शक्यता; केंद्र सबसिडी बंद करण्याच्या विचारात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 11:41 AM2023-11-04T11:41:52+5:302023-11-04T11:42:51+5:30
7,090 ई-बस, 5 लाख तीनचाकी वाहने, 55,000 चारचाकी प्रवासी कार आणि 10 लाख दुचाकींना अनुदानाद्वारे मदत देण्याचा सरकारचा मानस आहे.
नव्या वर्षात जर तुम्ही ईलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला झटका बसणार आहे. नव्या वर्षात इलेक्ट्रीक वाहने महागण्याची शक्यता आहे. ईव्ही वाहनांच्या विक्रीला बुस्ट मिळण्यासाठी सरकारकडून मिळत असलेली फेम-२ सबसिडी येत्या आर्थिक वर्षापासून बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता ईव्ही उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सरकारी मदतीची गरज नाहीय, असे मत अर्थ मंत्रालयाचे झाले आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स (FAME) अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी सबसिडी वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकारने 2015 ते 2019 या कालावधीत राबविण्यात आलेल्या FAME-1 योजनेसाठी 895 कोटी रुपयांची तरतूद केली होती. 2019 ते 2024 पर्यंत राबविण्यात आलेल्या FAME-2 योजनेअंतर्गत हे वाटप 10,000 कोटी रुपये करण्यात आले. EV उत्पादकांना FAME-3 अंतर्गत वाटप रक्कम वाढवण्याची आशा आहे. परंतु, सरकारने अद्याप FAME-3 योजनेअंतर्गत प्रमोट केल्या जाणार्या ईव्हीची श्रेणी निश्चित केलेली नाही.
2019 पासून लागू करण्यात आलेल्या FAME-2 अनुदान योजनेद्वारे, 1 ऑगस्ट 2023 पर्यंत 7.53 लाखांहून अधिक ईव्ही दुचाकींना सबसिडी मिळाली आहे. 7,090 ई-बस, 5 लाख तीनचाकी वाहने, 55,000 चारचाकी प्रवासी कार आणि 10 लाख दुचाकींना अनुदानाद्वारे मदत देण्याचा सरकारचा मानस आहे. परंतू, बसेस आणि दुचाकींची विक्रीच या योजनेंतर्गत उद्दीष्टाजवळ आहे.