इलेक्ट्रिक बाईक व स्कूटर आता महाग होणार! सरकारने सबसिडी केली कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 04:06 PM2023-05-22T16:06:52+5:302023-05-22T16:07:28+5:30
केंद्र सरकारने इलेक्ट्रिक टू-व्हीलरवरील सबसिडीत कपात केली आहे. नवीन कमी केलेली सबसिडी 1 जून 2023 पासून लागू होणार आहे.
सध्या इलेक्ट्रिक वाहने खूप महाग आहेत. दरम्यान, सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी दिली जाते. परंतु, सबसिडी असूनही इलेक्ट्रिक वाहनांची किंमत ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) असलेल्या वाहनांपेक्षा जास्त आहे. आता जर आपण टू-व्हीलर इलेक्ट्रिक वाहनांबद्दल बोललो तर त्यांच्या किंमती आणखी वाढणार आहेत. कारण केंद्र सरकारने इलेक्ट्रिक टू-व्हीलरवरील सबसिडीत कपात केली आहे. नवीन कमी केलेली सबसिडी 1 जून 2023 पासून लागू होणार आहे.
अवजड उद्योग मंत्रालयाने (Heavy Industries Ministry) जाहीर केले आहे की, सबसिडीची रक्कम आता 15,000 रुपये प्रति किलोवॅटऐवजी 10,000 रुपये प्रति किलोवॅट असणार आहे. सरकारने सबसिडीत प्रति किलोवॅट 5000 रुपयांची कपात केली आहे. 1 जूनपासून याची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, कमी केलेली सबसिडी 1 जूननंतर नोंदणी केलेल्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना लागू होईल. म्हणजेच या मे महिन्यात जर कोणी ग्राहक इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटर खरेदी केली तर तो काही पैसे वाचवू शकेल.
सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम अशा लोकांच्या खिशावर होणार आहे, ज्यांना इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करायची आहे, कारण आता त्यांना कमी सबसिडी मिळणार आहे. सबसिडी कमी मिळाल्याने त्यांना दुचाकी इलेक्ट्रिक वाहनासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या विक्रीवरही परिणाम होऊ शकतो. कारण लोक आधीच इलेक्ट्रिक टू-व्हीलर महाग असल्याच्या तक्रारी करत आहेत.
आता सबसिडी कमी केल्यानंतर, त्यांच्या किमती आणखी वाढतील. ज्यामुळे लोकांना इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करताना पुन्हा एकदा विचार करावा लागेल. किंमत कमी ठेवण्यासाठी कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये कमी फीचर्स देण्यास सुरुवात करतील अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.