ईलेक्ट्रीक कारची विक्री १४ टक्क्यांनी वाढली, पण टाटाची घसरली; एमजी बाजी मारणार, त्यात महिंद्रा येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 02:33 PM2024-12-03T14:33:54+5:302024-12-03T14:34:30+5:30
EV Car, Suv Sale: गेल्या नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रीक कार आणि एसयुव्हींच्या विक्रीत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या इलेक्ट्रीक वाहनांत पहिल्या नंबरवर असलेल्या टाटाला एमजी मोटर्सकडून मोठी स्पर्धा मिळत आहे.
महागाई, चढ्या व्याजदरांमुळे वस्तूंचे उत्पादन वाढले तरी मागणी कमी झाल्याने देशाचा जीडीपी कमालीचा घसरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो इंडस्ट्री मोठ्या संकटातून जात आहे. टाटासह अनेक कंपन्यांच्या कारची विक्री होत नाहीय, अनेक कार गोदामांमध्येच पडून आहेत. यासाठी कंपन्या लाखोंचा डिस्काऊंट देत आहेत. तरीही ग्राहक मिळत नाहीय अशी अवस्था झाली आहे. याचा फटका पाण्यासारख्या विकल्या जाणाऱ्या ईव्ही वाहनांना बसलेला नसला तरी टाटाला मात्र बसला आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रीक कार आणि एसयुव्हींच्या विक्रीत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या इलेक्ट्रीक वाहनांत पहिल्या नंबरवर असलेल्या टाटाला एमजी मोटर्सकडून मोठी स्पर्धा मिळत आहे. एमजीची विंडसर ईव्ही गेमचेंजर ठरू लागली असून तिची विक्री वाढल्याने टाटाची विक्री घसरली आहे. यातच येत्या दोन महिन्यांत महिंद्राच्या ईव्ही कार देखील धुमाकुळ घालण्यास सुरुवात करणार असल्याने सर्व्हिसच्या बाबततीत यथातथाच असलेल्या टाटाला मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी जास्त ईलेक्ट्रीक कार विकल्या गेल्या आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये ७५३९ कार विकल्या गेल्या होत्या, त्या २०२४ मध्ये याच महिन्यात ८६९६ एवढ्या विकल्या गेल्या आहेत.
टाटाची आकडेवारी पाहिली तर नोव्हेंबर २०२३ मध्ये ५१२४ कार विकल्या गेल्या होत्या, तर नोव्हेंबर २०२४ मध्ये ४१९६ कार विकल्या गेल्या आहेत. जवळपास १८ टक्क्यांनी ही विक्री घटली आहे. ऑक्टोबर २०२४ शी तुलना करायची झाल्यास ही २२०० पेक्षा जास्त घट आहे. ऑक्टोबरमध्ये ६४४९ कार विकल्या गेल्या होत्या. महत्वाचे म्हणजे टाटाने नुकतीच कर्व्ह ईव्ही लाँच केली होती. परंतू, ती टाटाला बूस्ट देऊ शकलेली नाही.
एमजीने नोव्हेंबरमध्ये गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपेक्षा तिप्पटीने जास्त कार विकल्या आहेत. यात विंडसरचा वाटा मोठा आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये एमजीने ९५६ कार विकल्या होत्या. यंदा एमजीने नोव्हेंबरमध्ये ३१२६ कार विकल्या आहेत.