भंगारातून बनविल्या इलेक्ट्रिक कार, प्रदूषण करत नाही तर चक्क गिळतात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 06:24 AM2022-12-11T06:24:10+5:302022-12-11T06:24:23+5:30
चिमुकल्या शास्त्रज्ञांचा भन्नाट आविष्कार
लखनाै : देशातील तरुणांमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. अगदी शाळेत जाणारे विद्यार्थिदेखील भन्नाट आयडियाचा आविष्कार घडवीत आहेत. उत्तर प्रदेशात अवघ्या आठ ते १४ वर्षांच्या मुलांनी खास इलेक्ट्रिक कार विकसित केल्या आहेत. या गाड्यांचे सर्वांत माेठे वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रदूषण गिळतात. त्यासाठी डस्ट फिल्ट्रेशन सिस्टीम विकसित केली आहे. या कार्स फाइव्ह जी फीचरने सज्ज असून, भंगारात टाकलेल्या वस्तूंपासून त्या बनविण्यात आल्या आहेत.
११ वर्षांचा गर्वित सिंह, श्रेयांश, विराज आणि आर्यव मेहराेत्रा असे या शास्त्रज्ञांची नावे आहेत. गाड्या बनविण्यासाठी दीड वर्षे लागली. कार बनविसाठी राेबाेटिक तज्ज्ञ मिलिंद राज यांनी मदत केली. २०२१ पासून काम सुरू झाले हाेते. (वृत्तसंस्था)
इलाॅन मस्क यांचा प्रभाव, अशी सुचली आयडिया
या प्राेजेक्टचा मास्टरमाईंड गर्वित सिंह आहे. त्याच्यावर उद्याेगपती इलाॅन मस्क यांचा फार प्रभाव आहे. प्रदूषणामुळे देशात खूप अडचणी आहेत.
दिल्लीत मुलांना शाळेत जाता येत नाही, हे त्याने वयाच्या सातव्या वर्षी बातम्यांमध्ये वाचले हाेते. मस्क यांच्या प्रदूषणरहित इलेक्ट्रिक कार पाहून त्याला अशी गाडी बनविण्याची आयडिया आली.
nतिन्ही गाड्यांची रचना वेगवेगळी आहे. एक ते तीन सीटर या गाड्यांत असून, एकदा चार्ज केल्यावर त्या ११० किलाेमीटर एवढे अंतर पार करू शकतात.
nभंगारात पडलेल्या वस्तूंचा कारमध्ये वापर करण्यात आला. कारच्या पाच-सात फूट रेडिअसमधील धूळ आणि धूर शाेषून घेतला जाईल.
nपाच ते सहा फूट कारची लांबी असून, एका गाडीसाठी सुमारे एक लाखांहून अधिक खर्च आला आहे.
ड्राेन मॅन ऑफ इंडियाचे मार्गदर्शन
मिलिंद राज हे या मुलांचे गुरू आहेत. त्यांना माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ड्राेन मॅन ऑफ इंडिया असे नाव देऊन गाैरव केला हाेता. लखनाै येथे त्यांचे ड्राेन संशाेधन केंद्र आहे. पाकिस्तानातून आलेले ड्राेन्स ते डिकाेड करतात.
काय आहे
डीएफएस यंत्रणा?
या मुलांनी तीन इलेक्ट्रिक कार बनविल्या आहेत. त्या घातक वायू शाेषून घेतात. या कार जेवढ्या चालतील तेवढे आजूबाजूचे वातावरण स्वच्छ हाेईल. डीएफएसमध्ये एक फिल्टर आणि स्क्विरल केज माेटर बसविण्यात आली आहे. ती प्रदूषित हवा ओढते. फिल्टरद्वारे ती हवा शुद्ध करून वातावरणात साेडली जाते.
पेटंट करणार
अशा प्रकारची कार जगात काेणीही बनविलेली नाही. त्यामुळे आम्ही आमच्या कारच्या माॅडेलचे पेटंट घेणार आहाेत.
- गर्वित सिंह,
कार बनविणारा चिमुकलाशास्त्रज्ञ