Bounce Infinity E1: ईलेक्ट्रीक स्कूटरच्या आयुष्यात नवी पहाट उजाडणार; फक्त १० दिवस बाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 10:25 AM2022-04-08T10:25:11+5:302022-04-08T10:25:39+5:30
बॅटरी स्वॅपिंगसाठी कंपनी ३५ रुपयांपासून ८५ रुपयांपर्यंत चार्ज आकारणार आहे. यासाठी महिन्याचे सबस्क्रिप्शन देखील ठेवण्यात आले आहे. यामुळे पूर्ण विचार करून तुम्हाला ही स्कूटर घ्यावी लागणार आहे.
ईव्ही स्टार्टअप Bounce Infinity (बाउंस इन्फिनिटी) ने इलेक्ट्रीक स्कूटरच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. ही देशातील पहिली अशी स्कूटर आहे जी बॅटरी स्वॅपिंग संकल्पनेवर आधारित आहे. म्हणजेच तुम्हाला घरी किंवा अन् कुठेही बॅटरी चार्ज करत बसावी लागणार नाही, तर त्यांच्या स्वॅपिंग सेंटरला जाऊन काही मिनिटांतच बॅटरी बदलता येणार आहे.
Bounce Infinity E1 या इलेक्ट्रीक स्कूटरचे उत्पादन राजस्थानच्या भिवाड़ीमध्ये सुरु झाले आहे. या ठिकाणी ओकिनावासह अन्य कंपन्यांचे मॅन्युफॅक्टरिंग प्लांट आहेत. या स्कूटरच्या किंमतींची घोषणा आधीच झालेली आहे. आता या स्कूटरची डिलिव्हरी १८ एप्रिलपासून सुरु होणार आहे.
बॅटरी स्वॅपिंगसाठी कंपनी ३५ रुपयांपासून ८५ रुपयांपर्यंत चार्ज आकारणार आहे. यासाठी महिन्याचे सबस्क्रिप्शन देखील ठेवण्यात आले आहे. यामुळे पूर्ण विचार करून तुम्हाला ही स्कूटर घ्यावी लागणार आहे. जर तुम्हाला महिन्याचे सबस्क्रिप्शन घ्यायचे नसेल तर बॅटरीसह स्कूटर विकत घेणे आणि घरी चार्ज करणे हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला सबस्क्रिप्शनशिवाय बॅटरी स्वॅप करता येणार आहे. मात्र, त्यासाठी पर स्वॅप ८५ रुपये चार्ज केला जाणार आहे. शिवाय महिन्याला १५ ते २५ स्वॅप होणे आवश्यक आहे.
य़ा स्कूटरची रेंज ७५ सांगितली जात आहे. जरी या स्कूटरने ६० ची रेंज दिली तरी तुमचे महिन्याला १००० किमीचे रनिंग असल्यासच हे प्लॅन परवडणारे आहेत. Bounce E1 ई-स्कूटर स्पोर्टी रेड, स्पार्कल ब्लॅक, पर्ल व्हाईट, डॅसेट सिल्व्हर आणि कॉमेट ग्रे या रंगांत उपलब्ध आहे. याला 2 kWh बॅटरी (48V, IP67) इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. 10 शहरांमध्ये प्रति शहर किमान 300 बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एक महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला चार्ज करण्याची कटकट राहणार नाही.