Electric Scooter Caught Fire : आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरला लागली आग; तुमच्याकडेही असेल तर व्हा सतर्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 02:30 PM2022-03-29T14:30:51+5:302022-03-29T14:31:29+5:30
electric scooter caught fire incident : महाराष्ट्रातील पुणे आणि तामिळनाडूमधील वेल्लोरनंतर आता नवीन घटना तामिळनाडूतील मन्नपराई येथे घडली आहे.
दिवसेंदिवस वाहन उद्योगात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दुचाकी वाहनांची सर्वाधिक वाढ होत आहे. दरम्यान, यातच आता इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रातील पुणे आणि तामिळनाडूमधील वेल्लोरनंतर आता नवीन घटना तामिळनाडूतील मन्नपराई येथे घडली आहे.
सिंगापूरमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे मुरुगेसन हे गेल्या काही दिवसांपूर्वी सुट्टीवर आपल्या घरी आले होते. पाच महिन्यांपूर्वी त्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. ही इलेक्ट्रिक स्कूटर ओकिनावा ( Okinawa) कंपनीची असल्याचे सांगण्यात येत आहे. सिंगापूरला परतण्यापूर्वी 27 मार्च रोजी त्यांनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर मित्राच्या दुकानाबाहेर पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र बाळू याने दुकान उघडले असता इलेक्ट्रिक स्कूटरमधून धूर निघताना दिसला. यानंतर इलेक्ट्रिक स्कूटरने पेट घेतला. आजूबाजूला पाणी नसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने मिनरल वॉटर टाकून आग विझवण्यात आली.
याआधी शनिवारी महाराष्ट्रातील पुण्यातील धनोरी परिसरात ओला स्कूटरला (Ola Scooter) अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्यावर जळू लागली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सरकारने या घटनेची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
दुसरीकडे, वेल्लोरमध्येही काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जिंगदरम्यान तिच्या बॅटरीचा स्फोट झाला होता. यामध्ये वडील आणि मुलीचा मृत्यू झाला होता. मात्र, या घटनेच्या तपासात त्याने वाहन चार्ज करण्यासाठी चार्जर जुन्या सॉकेटमध्ये ठेवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन बॅटरीचा स्फोट झाला होता.