इलेक्ट्रीक स्कूटर कंपनी एथर डिझेल लाँच करणार; व्हेंडरने लीक केली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 02:58 PM2024-01-19T14:58:27+5:302024-01-19T14:59:24+5:30
इलेक्ट्रीक दुचाकींच्या बाजारपेठेत सर्वात आधी आपले पाय रोवणाऱ्या एथर इलेक्ट्रीकने नवीन फॅमिली स्कूटर आणायचे ठरविले आहे.
सध्या लोक प्रदुषणापेक्षा महागड्या इंधन दरांमुळे ईलेक्ट्रीक वाहनांकडे वळू लागले आहेत. इलेक्ट्रीक वाहने देखील महाग असली तरी ते घेत आहेत. या इलेक्ट्रीक वाहनांमध्ये मग ती कार असो की स्कूटर अनेक समस्याही आहेत. तरीही लोक त्याकडे वळत आहेत. येता काळ इलेक्ट्रीक वाहनांचाच असणार आहे. यामुळे कंपन्याही अधिकाधिक इलेक्ट्रीक वाहने आणण्याच्या तयारीत आहेत.
इलेक्ट्रीक दुचाकींच्या बाजारपेठेत सर्वात आधी आपले पाय रोवणाऱ्या एथर इलेक्ट्रीकने नवीन फॅमिली स्कूटर आणायचे ठरविले आहे. आधीच्या एथरच्या स्कूटर या लांबीने लहान होत्या, यामुळे त्यावर दोन प्रवासी बसणे कठीण जात होते. तसेच लेग आणि लगेज स्पेसही एवढी नव्हती. यामुळे ओला, टीव्हीएसच्या स्कूटरकडे लोक वळले होते.
आता एथरने फॅमिलीसाठी वापरता येणारी स्कूटर आणण्याचे ठरविले आहे. या स्कूटरच्या नावानेच एथर शॉक देण्याच्या तयारीत आहे. डिझेल या नावाने ही स्कूटर आणली जाणार आहे. या वर्षीच्या मध्यावधीत ही स्कूटर लाँच होण्य़ाची शक्यता आहे.
एथरच्या या प्लॅनशी संबंधीत व्यक्तीने याची माहिती दिली आहे. एथरच्या ४५० श्रेणीतील स्कूटर या परफॉर्मन्स आणि स्लीक डिझाईनसाठी ओळखल्या जात होत्या. परंतु आताची एथरची स्कूटर ही एका कुटुंबाला वापरता येणारी, त्यांच्या कौटुंबीक गरजा पूर्ण करणारी असेल असे या व्यक्तीने म्हटले आहे.
"आम्हाला Ather's 'Diesel' चा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो. बाजारातील इतर स्कूटर्सच्या तुलनेत ही सीट निश्चितच एक वेगळी आहे आणि संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे याचा आनंद घेऊ शकेल," असे UNO मिंडाच्या 2W विभाग झेबियर एस्कीबेल म्हणाले. उनो ही कंपनी Ather च्या पुरवठादारांपैकी एक आहे.