Electric Scooter Sale Drop: ट्रेंड काय सांगतोय? डिसेंबरमध्ये इलेक्ट्रीक स्कूटरची विक्री घटली; SMEV टेन्शनमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 14:46 IST2023-01-02T14:46:06+5:302023-01-02T14:46:22+5:30
सोसायटी ऑफ मॅन्यूफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकलने मार्च २०२३ पर्यंत १० लाख ईव्ही दुचाकी विक्रीचे लक्ष्य ठेवले होते.

Electric Scooter Sale Drop: ट्रेंड काय सांगतोय? डिसेंबरमध्ये इलेक्ट्रीक स्कूटरची विक्री घटली; SMEV टेन्शनमध्ये...
इलेक्ट्रीक स्कूटरच्या वाहनांच्या विक्रीत डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. यामुळे सोसायटी ऑफ मॅन्यूफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल (SMEV) टेन्शनमध्ये आली असून २०२२-२३ मध्ये ठेवलेले १० लाख विक्रीचे लक्ष्य पार करता येणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १० लाख इलेक्ट्रीक स्कूटर विक्री करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. यामध्ये २० टक्क्यांची घसरण होईल असा अंदाज एसएमईव्हीने लावला आहे. म्हणजेच ३१ मार्च २०२३ पर्यंत आठ लाखांच्या आसपास ईव्ही विकल्या जातील.
केंद्र आणि राज्य सरकारांनी 1,100 कोटी रुपयांच्या सबविडी रोखल्या आहेत. महाराष्ट्रासह काही राज्यांनी प्रोत्साहन सबसिडी बंद केली असून काही राज्यांनी सुरुवातीला जाहीर केलेल्या सबसिडीमध्ये कपातही केल्याने त्याचा विक्रीवर परिणाम झाला आहे.
हिरो इलेक्ट्रिक, ओला आणि ओकिनावा या तीन आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांनी प्रत्येकी लाख स्कूटर विक्रीचा टप्पा ओलांडल्याने २०२२ मध्ये विक्रीचा आकडा ६ लाखांवर गेला आहे. २०२३ मध्ये स्कूटरच्या विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा संस्थेला आहे.
2022 च्या शेवटच्या महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीच्या आकडेवारीत 28 टक्के घट झाली आहे. वाहन पोर्टलनुसार, डिसेंबरमध्ये देशात एकूण 59,554 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली, तर एक महिन्यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये ही संख्या 76,162 युनिट्स होती. अद्याप कंपन्यांच्या हाती तीन महिने आहेत. यामुळे या तीन महिन्यांत चांगले प्रदर्शन होण्याची अपेक्षा ईव्ही निर्माता कंपन्यांना आहे.