इलेक्ट्रिक व्हेइकल्सना मिळणार ‘ऊर्जा’; राज्यभरात उभारले जाणार दीड हजार चार्जिंग पॉइंट्स, महामार्गांना प्राधान्य
By सचिन लुंगसे | Published: July 31, 2022 06:13 AM2022-07-31T06:13:16+5:302022-07-31T06:13:51+5:30
ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांच्या विस्ताराला गती देण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल यांच्या सदस्यांच्या विकासक मालमत्तांमध्ये ५ हजार ईव्ही चार्जिंग पॉइंट्स बसविण्यासाठी टाटा पॉवरने सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती टाटा पॉवरचे मुंबई वितरण प्रमुख नीलेश काणे यांनी दिली.
- सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विजेवर धावणाऱ्या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेत, यंदाच्या वर्षी राज्यभरात १५०० हून अधिक चार्जिंग पॉइंट्स उभारले जाणार आहेत. या चार्जिंग पॉइंट्सपैकी बहुतांश केंद्रे महामार्गांवर असतील. तूर्त सर्व प्रमुख महामार्गांवर १०० हून अधिक चार्जिंग पॉइंट्स असून, २०२३च्या अखेरपर्यंत ही संख्या ३५० पर्यंत वाढविली जाणार आहे.
२०२३ साली महाराष्ट्रभरातील महामार्गांवर दोन्ही बाजूंना दर १२५ ते १५० कि.मी. अंतरावर चार्जर्स बसविले जातील. ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांच्या विस्ताराला गती देण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल यांच्या सदस्यांच्या विकासक मालमत्तांमध्ये ५ हजार ईव्ही चार्जिंग पॉइंट्स बसविण्यासाठी टाटा पॉवरने सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती टाटा पॉवरचे मुंबई वितरण प्रमुख नीलेश काणे यांनी दिली.
१००० केंद्रे मुंबईत
मुंबई आणि उपनगरांमध्ये ६०० पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंट्स उभारण्यात आले आहेत. २०२३ संपेपर्यंत हा आकडा १ हजारावर जाईल. मोठे मॉल्स, पार्किंगच्या सार्वजनिक जागांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे.
किती धावते एक वाहन ?
३० केडब्ल्यूएच बॅटरी क्षमता असेल तर वाहन
२००-२२०
कि.मी. अंतर धावू शकते.
एक कार चार्ज व्हायला किती वेळ?
n कारच्या बॅटरीचा आकार आणि चार्जिंग ज्या चार्जरने केले जात आहे, त्याची क्षमता यावर हे अवलंबून असते. साधारणपणे चारचाकी ईव्हीच्या बॅटरीची क्षमता जवळपास ३० केडब्ल्यूएच असते.
n जर ही कार एका ३० केडब्ल्यू डीसी वेगवान चार्जरने चार्ज केली जात असेल, तर एका तासात बॅटरी पूर्ण चार्ज होईल.
n जर तीच कार एका ७.४ केडब्ल्यूच्या एसी टाईप-२ चार्जरने चार्ज केली जात असेल, तर चार्जिंग पूर्ण होण्यास जवळपास ४ तास लागतात.
कार्बन उत्सर्जनात घट
वाहनांमधून दरवर्षी जवळपास ५०० मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन होते. चारचाकी आणि तीनचाकी विभागांत सर्वच्या १०० टक्के गाड्या विजेवर चालणाऱ्या असतील तर कार्बन उत्सर्जनात ३५ टक्के घट होईल.
राज्यात विजेवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या जवळपास
७००० आणि वर्षभरात सरासरी १२ हजार कि.मी. प्रवास असे गृहीत धरल्यास वर्षभरात ६०लाख लीटर इंधनाची बचत होऊ शकते.
n केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने चार्जिंग पॉइंट्स उभारण्याचे काम टाटा पॉवर करीत आहे. पुणे-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे महामार्गावर चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत.