EV वाहनांबाबत मोठी घोषणा, मोदी सरकार देणार रु. 50000 पर्यंतची मदत, जाणून घ्या माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 08:42 PM2024-03-31T20:42:42+5:302024-03-31T20:44:49+5:30
EMPS 2024: ही योजना उद्या, म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून सुरू होईल.
EMPS 2024: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. पण, अजूनही देशातील एक मोठा वर्ग इलेक्ट्रीक वाहनांकडे वळलेला नाही. त्यामुळे देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला (Electric Mobility) चालना देण्यासाठी सरकार विविध पाऊले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून 500 कोटी रुपयांची नवीन योजना सोमवारपासून (1 एप्रिल) लागू केली जाईल. ही योजना जुलै अखेरपर्यंत सुरू असेल.
देशात फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हीकल्स (FAME-II) प्रोग्रामचा दुसरा टप्पा 31 मार्च 2024 रोजी संपत आहे. फेम योजनेंतर्गत मिळणारी सब्सिडी 31 मार्चपर्यंतच लागू असेल. आता देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) विक्रीत गती आणण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने 500 इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 (EMPS 2024) सुरू केली आहे.
50,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल
EMPS 2024 अंतर्गत प्रत्येत EV दुचाकीच्या खरेदीवर 10,000 रुपयांपर्यंतची सब्सिडी दिली जाईल. अंदाजे 3.33 लाख दुचाकींना सब्सिडी देण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, छोट्या तीन चाकी वाहनांच्या (ई-रिक्षा आणि ई-कार्ट) खरेदीवर 25,000 रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. योजनेंतर्गत अशा 41000 हून अधिक वाहनांना सब्सिडी दिली जाईल. तर, मोठ्या थ्री व्हीलरच्या खरेदीवर 50000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल.
EMPS 2024 ही मर्यादित कालावधीची योजना आहे. यामध्ये, इलेक्ट्रिक टू-व्हीलर आणि थ्री-व्हिलरच्या खरेदीवर मदत पुरवली जाईल. ही योजना 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024, या चार महिन्यांसाठी लागू असेल आणि या योजनेवर एकूण 500 कोटी रुपये खर्च केले जातील.