ईव्ही, हायड्रोजन ट्रक बनविणाऱ्या निकोलाचा संस्थापक गुंतवणूकदारांशी खोटे बोलला; 4 वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 11:03 AM2023-12-20T11:03:50+5:302023-12-20T11:17:03+5:30
मॅनहॅटन फेडरल कोर्टात यावर सुनावणी झाली होती. यावर सोमवारी निकाल सुनावण्यात आला. सरकारी वकिलांनी ११ वर्षांची शिक्षा देण्याची मागणी केलेली.
इलेक्ट्रीक आणि हायड्रोजनवर चालणारे ट्रक बनविणारी कंपनी निकोलाचे संस्थापवक ट्रेवर मिल्टन यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षी मिल्टन हे गुंतवणूकदारांशी खोटे बोलले होते, त्या आरोपांखाली त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
निकोला यांनी सुरुवातीलाच पिकअप ट्रक बनविला होता, यामध्ये त्यांनी स्वत:ची बॅटरी विकसित केल्याचा दावा केला होता. परंतु, ही बॅटरी ते विकत घेत होते, हे त्यांना ज्ञात होते. तसेच त्यांनी निकोला वन हा सेमी ट्रक बनविला होता, त्याला यश मिळाले होते, असे गुंतवणूकदारांना सांगितले होते. परंतु, त्यांचा ट्रक काम करत नव्हता हे त्यांना माहिती होते. या दोन खोट्या दाव्यांवरून मिल्टन यांना चार वर्षांची शिक्षा झाली आहे.
मॅनहॅटन फेडरल कोर्टात यावर सुनावणी झाली होती. यावर सोमवारी निकाल सुनावण्यात आला. कंपनीबद्दलची त्यांची विधाने खोटी आहेत हे त्यांना माहित आहे. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबासाठी हे ऐकणे जितके कठीण असेल तितकेच, मला विश्वास आहे की ज्युरी योग्य होती, असे निकाल देताना यूएस जिल्हा न्यायाधीश एडगर रामोस यांनी म्हटले.
न्यायाधीशांनी मिल्टनला त्याच्या शिक्षेविरुद्ध अपील प्रलंबित ठेवत जामिनावर सोडण्याची परवानगी दिली. 41 वर्षीय मिल्टनला सुमारे 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. यासाठी त्यांनी थेरानोसच्या संस्थापक एलिझाबेथ होम्सच्या 2022 मधील फसवणूक प्रकरणाचा हवाला दिला होता. परंतु, न्यायाधीशांनी ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असल्याचे सांगत ही मागणी फेटाळली होती.
मिल्टन य़ांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणालाही इजा करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता आणि माझ्यावर आरोप केलेले गुन्हे मी केलेले नाहीत. मला तुरुंगाऐवजी प्रोबेशन चांगले ठरेल कारण मला आजारी पत्नीची सेवा करता येईल, अशी विनंती मी न्यायाधीशांना केली होती, असे मिल्टन यांनी सांगितले.