किंमती वाढल्या, व्याजदर वाढले तरी वाहनांची विक्री काही थांबेना; ऑगस्ट ऑल टाईम हायवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 02:43 PM2023-09-05T14:43:22+5:302023-09-05T14:44:54+5:30
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स एसोसिएशन (FADA) ने वाहनांच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत.
गेल्या दोन-चार वर्षांत कारच्या किंमतींमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. ज्या किंमतीत डिझेलच्या कार येत होत्या त्या किंमतीत आता पेट्रोल कार येऊ लागल्या आहेत. काही कारच्या किंमतीतर जवळपास दुप्पट झाल्या आहेत. असे असले तरी गाड्यांचा खप काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. तो वाढतच चालला आहे, एवढा की गेला ऑगस्ट ऑल टाईम हायवर विक्री झाली आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स एसोसिएशन (FADA) ने वाहनांच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. भारतीय ऑटो कंपन्यांनी वार्षिक महिना आधारावर 8.63% टक्के वाढ नोंदविली आहे. गेल्या ऑगस्टमध्ये कंपन्यांनी 18 लाख 18 हजार 647 वाहने विकली आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा आकडा १६.७४ लाख एवढा होता.
तीनचाकी वाहनांच्या विक्रीत ६६.१५% वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात, देशात एकूण 60,132 तीनचाकी वाहनांची विक्री झाली असून, बजाज ऑटोने 33,581 विक्रीसह आघाडीवर आहे. वर्षभरापूर्वी ६०,१३२ तीनचाकी वाहनांची विक्री झाली होती. व्यावसायिक सेगमेंटमध्ये वार्षिक 3.23% वाढ झाली आहे, यामध्ये टाटा मोटर्स 27,483 वाहनांच्या विक्रीसह पहिल्या स्थानावर आहे. प्रवासी वाहन विक्रीत मारुती सुझुकी पहिल्या क्रमांकावर आहे.
मारुती सुझुकीने सर्वाधिक 1.33 लाख कार विकल्या आहेत. मारुती सुझुकीचा बाजार हिस्सा वार्षिक आधारावर 39.41% वरून 42.37% पर्यंत वाढला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने 1.16 लाख कार विकल्या होत्या.