केवळ पाहाणीवरून खरेदीदारांच्या सरसकट मतांचा विचार चुकीचाच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 03:56 PM2017-08-28T15:56:20+5:302017-08-28T15:58:13+5:30
महिलांना कार कोणत्या आवडतात, त्या कशाला महत्त्व देतात, याबाबत एक पाहाणी अहवाल काढला गेला आहे. त्यात केवळ तीन कंपन्यांना महिलांची पसंती असल्याचे सांगत खरे म्हणजे अहवालाने विश्वासार्हताच गमावली असल्याचे म्हणावे लागेल.
गेल्या आठवड्यात कारबाबत महिला खरेदीदार वा ग्राहकांची मते काय आहेत, यावर निष्कर्ष काढणारा एक पाहाणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतातील मोठ्या शहरांमधील कारमालक महिला व इच्छुक कार खरेदीदार महिला अशा सुमारे ३५०० पेक्षा जास्त महिलांच्या सर्वेक्षणाच्या आधारे अहवाल तयार करण्यात आल्याचे दिसते. हा अहवाल खरा म्हणजे प्रातिनिधीक स्वरूपाचाही म्हणता येणार नाही. या महिलांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या आधारावर तो तयार केलेला दिसतो. त्यामध्ये भारतीय महिलांना कार कोणत्या आवडतात यावर तीन कंपन्यांचा उल्लेख त्यात केला आहे. तर महिलांनी कारची सुरक्षितता व त्यातील सुविधा यावर अधिक भर दिला असल्याचे व त्या आधारे त्यांनी आपल्याला कोणती कार घ्यायला आवडते वा कोणत्या कंपनीची कार त्यांना अधिक आवडते यावर या अहवालात निष्कर्ष काढण्यात आला आहे.
अशा प्रकारचे अहवाल हे मुळात केवळ महानगरांमधील महिलांच्या मतांवर बनवलेले असतील तर ते प्रतिनिधीक तरी का म्हणावेत, असा प्रश्न पडतो. मुळात अनेक निमशहरांमध्ये कार मालक, इच्छुक ग्राहक महिला अनेक आहेत. त्यांची मते वास्तविक शहरापेक्षा खूपच भिन्न असतात. अशा स्थितीत विशिष्ट कंपन्यांच्या भलावणीसाठी तयार केल्या जाणाऱ्या अहवालांवर विश्वास कसा ठेवावा, असा प्रश्न पडतो. एखादी महिला कार घेण्याचा विचार करते तेव्हा ती कोणत्याही महानगरातील जरी असली तरी ती आर्थिकदृष्टीने पूर्ण सक्षम असते. ती स्वतःचे निर्णय घेताना स्वतः घेत असली तरी कारच्या बाबतीत ती आपल्या घरातील सदस्यांची, पतीची, भावाची, मित्र, शेजारी, मैत्रिणी यांचीही मते घेत असते. मदत घेत असते. त्यामुळे केवळ सुरक्षितता व सुविधा याकडे महिला कार घेताना निश्चितपणे बघणार नाहीत. कार घेणारा कोणीही ग्राहक असला तरी तो त्या कारच्या बाबतीत बराचसा चोखंदळ राहाण्याचा प्रयत्न करतो. कारची सुरक्षितता हा मुद्दा काही तीन कंपन्यांशी निगडित नसतो.
प्रत्येक कंपनी ही आपली कार तयार करताना तिच्या सुरक्षिततेविषयी अधिकाधिक काळजी घेऊन त्याबाबतची वैशिष्ट्ये नेहमी ग्राहकांपुढे सादर करीत असते. दुसरी बाब कारमधील सुविधा या ही आता सर्वच कंपन्या आपापल्या कारमध्ये देत असतात.कारची किंमत, तिची श्रेणी यानुसार त्या त्या सुविधा उपलब्ध होत असतात. एखाद्या मॉडेलच्या किमान तीन ते चार श्रेणींमध्ये कंपन्या सादरीकरण करीत असतात. कोणत्याही अतार्किक अहवालावर खरे म्हणजे विसंबून राहाता कामा नये, हे आता भारतातील ग्राहकांना समजू लागले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुरक्षिततेबाबत क्रॅश टेस्ट ही भारतात अजून तरी सक्तीची असलेली दिसत नाही. त्यामुळे कंपन्यांनी दिलेली माहिती, त्यांची विश्वासार्हता, सरकारी विभागाकडून त्यासाठी दिलेली परवानगी यावरच ग्राहकाला अवलंबून राहावे लागते. साहजिकच महिला व पुरुष ग्राहक यांच्या कारबाबतच्या मतांमध्ये अनेक स्तरावर साधर्म्य आढळते. महिला स्वतः कार चालवणारी असली तरी आज कारसाठी असेल्या अनेक सुविधा या पुरुषांनाही आकर्षित करीत असतात. किंबहुना सुरक्षिततेबरोबरच महिला या कार चालवण्यातील सुलभता, उंचीच्या दृष्टीने उपयुक्तता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली आर्थिक क्षमता याकडेच अधिक नजर लावून असतात.