स्कूटर्स-बाईक्स होऊ शकतात स्वस्त! FADA ने सरकारकडे केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 11:41 AM2023-09-15T11:41:19+5:302023-09-15T11:41:50+5:30
कोविड महामारीच्या काळात ऑटो सेक्टरला मोठा फटका बसला. त्यामुळे जीएसटीचा दर १८ टक्क्यांवर आणावा, अशी एफएडीएची मागणी आहे.
नवी दिल्ली : फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (FADA) एंट्री लेव्हल टू-व्हीलरवरील वस्तू आणि सेवा कर (GST) दर कमी करण्याचे आवाहन सरकारला केले आहे. कोविड महामारीच्या काळात ऑटो सेक्टरला मोठा फटका बसला. त्यामुळे जीएसटीचा दर १८ टक्क्यांवर आणावा, अशी एफएडीएची मागणी आहे.
एंट्री लेव्हल टू-व्हीलर सेक्टर लॉकडाऊन दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यास अद्याप सक्षम नाही. त्यामुळे जीएसटी दर कमी केल्याने सेगमेंटचे नुकसान लवकर भरून काढता येईल, असे म्हणणे एफएडीएचे आहे. ऑटो रिटेल कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना एफएडीएचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले की, सध्या एकूण वाहन विक्रीत ७ टक्के वाढ झाली आहे, परंतु एंट्री लेव्हल टू-व्हीलर सेगमेंटमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही.
याचबरोबर, दरवर्षी टू-व्हीलर सेगमेंटमध्ये निश्चितच वाढ दिसून आली, परंतु कोविड महामारीच्या आधीच्या बिझनेसची तुलना केल्यास, हा सेगमेंट अद्यापही २० टक्के मागे आहे आणि अजूनही नुकसान भरून काढत आहे, असे मनीष राज सिंघानिया म्हणाले. तसेच, या कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. यावेळी मनीष राज सिंघानिया यांनी नितीन गडकरींना सांगितले की, सरकारने एंट्री लेव्हल टू-व्हीलरवरील जीएसटी कमी करावा. सध्या हा जीएसटी २८ टक्के असून तो १८ टक्के करण्यात यावा.
१०० आणि १२५ सीसी बाईक्स स्वस्त होऊ शकतात
दरम्यान, सरकारने एफएडीएची मागणी पूर्ण केली तर एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये जीएसटी कमी केल्यास त्याचा थेट परिणाम १०० आणि १२५ सीसी बाईक्सवर होईल. तसेच, मनीष राज सिंघानिया म्हणाले की, हे करणे धोरणात्मक समायोजन होणार नाही परंतु असे केल्याने या सेक्टरला मोठी आर्थिक मदत होईल. एकूण वाहन विक्रीपैकी ७५ टक्के विक्री या सेगमेंटमधून होते.