कौटुंबिक कार... किमान गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:40 PM2017-08-11T18:40:00+5:302017-08-11T18:40:00+5:30
कार खास कुटुंबाच्या वापरासाठी घ्यायची असेल तर एसयूव्हीसारखे चांगले वाहन नाही. अर्थात तरीही ते घेताना विविध घटकांची तपासमी केल्याशिवाय वाहनाची निवड करू नये.
कारचा वापर ही अनेकांच्यादृष्टीने चैनीची नव्हे तर गरजेची बाब झाली आहे. आजची चैन ती उद्याची गरज असते, असेच काहीसे या कारबाबत झाले आहे. त्यात चूक काही नाही. कार कशासाठी घेत आहात, आपली आर्थिक स्थिती कशी आहे व कारचा वापर किती करणार आहात, कसा करणार आहात, किती काळ कार वापरू इच्छिता, कुटुंबातील अन्य कोणी कार चालवू शकतो का, कोणत्या रस्त्यांवर प्रामुख्याने तुमची कार चालवली जाणार आहे असे अनेक प्रश्न कार घेण्यापूर्वी स्वतःला विचारावेत. गरजांनुसार विचार केला तर कौटुंबिक कार वा (family car) घेताना या सर्व प्रश्नांचा विचार जरूर करावा. त्यामुळे लांबच्या प्रवासामध्येही तुम्हाला तुमच्या मोटारीचा वापर चांगल्या पद्धतीने व आनंदात करता येईल.
सर्वसाधारणपणे अनेकांना सात माणसांच्या प्रवासाची सोय हवी असणारी कार वा एसयूव्ही हवी असते. त्यामुळे अर्थातच एसयूव्ही कोणती घ्यायची याचा विचार ते करायला सुरुवात करतात. एसयूव्ही वा एमयूव्ही अशा दोन प्रकारांचा ते विचार करू शकतात. त्यामध्ये सर्वप्रथम विचार करावा लागतो, तो तुमच्या आर्थिक बाबींचा, त्यानंतर आपल्याबरोबरच्या सर्वांना आरामदायीपणे त्यात बसता येईल का, त्यामध्ये सामानही सर्व प्रवाशांचे नीटपणे राहून प्रवासात असुविधा होणार नाही ना, त्यासाठा कॅरियर लावण्याची गरज आहे का, जास्त प्रवासी बसू शकतील अशा एसयूव्ही कौटुंबिक उद्दिष्टांसाठी वापरावयाची असेल तर त्या एसयूव्हीला पार्किंगही नीटपणे मिळायला हवे. साधारण महिन्यामध्ये एकदा तरी ती मोटार लांबच्या प्रवासासाठी वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे पैसे गुंतवण्याचे सुख मिळेल, अन्यथा वर्षातून दोनदा-तीनदाच प्रवासाला लांब जाण्याचा विचार असले तर त्यापेक्षा टुरिस्ट कार वापरणे योग्य असेल. सात सीटर एसयूव्ही म्हटली की तिची किंमत किमान १० लाख रुपयांच्यावर जाणार आहे. यामुळेच तुमच्या सर्वांच्या प्रवाससुविधा, आरामदायीपणा व मोटारीचे मायलेज या बाबीही विचारात घ्यायला हव्यात. त्यानंतर ती एसयूव्ही सेन्सर्सद्वारे आधुनिक सुविधाही हव्यात का, याचाही विचार करा. त्यामुळे जरी किंमत जास्त पडली तरी ती उपयुक्त ठरू शकते. देखभालखर्च हा साहजिकच तितका मोठा वाटणारही नाही. ज्या कंपनीची एसयूव्ही तुम्हाला हवी आहे, ती घेण्यापूर्वी त्या कंपनीच्या सेवाकेंद्राबाबत, सुट्याभागांबाबत चौकशी नीट करा, त्यामुळे लांबच्या प्रवासात काही अडचण आलीच तर त्या सेवा केंद्राचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. एसयूव्ही घेतानाच तुमच्या कुटुंबातील अन्य कोणी ड्रायव्हिंग करणारे असेल तर त्यालाही त्या एसयूव्हीची टेस्टड्राईव्ह नक्कीच द्या.
एसयूव्ही प्रामुख्याने डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमधील असल्याने त्याचे मायलेज, ताकद, स्पेस या सर्व बाबी महत्त्वाच्या असल्या तरी बसण्याच्या आसनव्यवस्थेमध्ये वेगळी काही वैशिष्ट्ये आहेत का ते ही पाहून घ्या. आसनव्यवस्था सर्वांना चांगल्या पद्धतीने सामावून घेणारी आहे की नाही, ते पाहाणेही महत्त्वाचे आहे. लांबच्या प्रवासामध्ये आसनव्यवस्था सर्वांसाठी सुविधाजनक व आरामदायी हवी, हे लक्षात घेऊन निवड करा. अन्यथा मधल्या व अखेरच्या रांगेत बसणाऱ्यांचे गुडघे पुढच्या सीटच्या मागे लागत असल्याने फुटस्पेस तुम्हाला मिळत नाही. काहीवेळा इतकी माणसे बसू शकतात असे सांगताना ही फूटस्पेस मात्र कमी केलेली असते. यासाठी चित्रांवर नव्हे तर प्रत्यक्ष शोरूममध्ये जाऊन एसयूव्हीचे अवलोकन करा व मगच पर्याय निवडा. कौटुंबिक वापरासाठी वाहन घेताना इतकी काळजी घ्यायला नको का?